दादांनी हट्ट केल्यास मोर्चा विसर्जन नाही
By admin | Published: October 11, 2016 12:57 AM2016-10-11T00:57:08+5:302016-10-11T00:58:25+5:30
निवेदन अधिकाऱ्यांना देणार : पालकमंत्र्यांच्या उपस्थितीलाही तीव्र विरोध; मराठा मोर्चाच्या कोअर कमिटीची भूमिका
कोल्हापूर : सकल मराठा मोर्चाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच निवेदन देणार आहे. या मोर्चाला कोणताही राजकीय रंग आम्हाला द्यायचा नाही; परंतु पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन स्वीकारण्याचा हट्ट केल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येणार नाही व तोपर्यंत मोर्चाचेही विसर्जन होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सोमवारी सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीवरून नवा वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्रशासन आणि मोर्चाची कोअर कमिटी यांची सलोख्यासाठी एकत्रित बैठक सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी सकल मराठा समाजाच्या कोअर कमिटीच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
मोर्चाच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित राहणार असल्याची भूमिका यापूर्वी पालकमंत्री पाटील यांनी घेतली आहे, पण या भूमिकेला मराठा मोर्चा कोअर कमिटीच्यावतीने पुन्हा विरोध केला आहे.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी सैनी यांनी काही सूचना केल्या. त्यावेळी आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, ते निवेदन स्वीकारणार
नसतील तर मोर्चा विसर्जित होणार नाही, अशी भूमिका कोअर कमिटीच्या डॉ. जयश्री चव्हाण आणि चंद्रकांत साळोखे यांनी मांडली. पण, याचे खंडन करताना, पालकमंत्री पाटील हे मोर्चादिवशी कोल्हापुरात असल्याने निवेदन स्वीकारताना ते आमच्यासोबत दालनात उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले.
या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेला बैठकीतील सकल मराठा समाज कोअर कमिटीच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. आम्हाला मोर्चाला कोणताही राजकीय चेहरा नको आहे, त्यासाठी मोर्चातील नेत्यांनाही आम्ही मोर्चाच्या सर्वांत मागे ठेवले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करून पालकमंत्री पाटील यांना निवेदन स्वीकारतेवेळी उपस्थित राहण्यास विरोध दर्शविला. (प्रतिनिधी)
सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मोर्चावर लक्ष
कोल्हापुरात होणाऱ्या संपूर्ण मोर्चावर शहरातील ‘सेफ सिटी’च्या सीसी टीव्ही कॅमेरांद्वारे लक्ष ठेवणार असून, गोंधळ अगर आक्षेपार्ह घटना घडल्यास त्वरित वॉकीटॉकीवरून घटनास्थळी सूचना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. वेगाने कामाला लागा, मोर्चाची सर्व तयारी गुरुवारपर्यंत (दि. १३) पूर्ण करा, शुक्रवारी (दि. १४) पुन्हा आढावा घेऊन त्रुटी दूर करू, अशाही सूचना त्यांनी कोअर कमिटीला केल्या. /सविस्तर वृत्त हॅलो १ वर