रॉकेल हवे तर मग हमीपत्र लिहून द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:14 PM2018-11-15T12:14:56+5:302018-11-15T12:24:01+5:30
गँसची जोडणी नसलेल्या कुटूंबानाच यापुढील काळात रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे.
पुणे : गँसची जोडणी नसलेल्या कुटूंबानाच यापुढील काळात रॉकेलचे वाटप करण्यात येणार आहे. कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तिच्या नावावर गँस जोड्णी नसल्याचे हमीपत्र दिल्याशिवाय संबंधित व्यक्तीला रॉकेल घ्यावे लागणार आहे. पॉस मशिनव्दारे व पॉस मशिनशिवाय रॉकेल घेणा-या सर्व शिधापत्रिका धारकांना स्वत:च्या तसेच कुटूंबातील सदस्यांच्या नावे गँस जोडणी नसल्याबाबत हमीपत्र द्यावे लागणार आहे. यात व्यक्तीने खोटे हमीपत्र दिल्यास त्यावर फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे. अशी माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून अनेक कुटुंबांना गॅसची जोडणी दिल्यानंतर सरकाने रेशनकार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या निळ्या रॉकेलच्या वापरावर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यांच्याकडे गॅस सिलेंडरची व्यवस्था नाही, अशा कुटुंबांनाच रॉकेल देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गॅस असूनही आमच्याकडे गॅस नाही, असे खोटे सांगून शिधापत्रीकेवर गॅसचा शिक्का मारु देत नाही. ही बाब निदर्शनास आल्याने गॅसची जोडणी असलेल्या कुटूंबांना रॉकेल न देण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास पुरवठा विभागाने सुरुवात केली आहे. त्यासाठी पॉस मशिनवरुन रॉकेलचे वाटप सुरु केल्यानंतर आता गॅस जोडणी नसल्याचे हमीपत्र घेवूनच रॉकेलचे वाटप करण्याते आदेश पुरवठा विभागाने दिले आहे. तसेच हमीपत्र खोटे निघाल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे मोरे यांनी सांगितले. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेद्वारे जिल्ह्यात शंभर टक्के गॅस जोड देण्याचे उद्दिष्ट असून ते बºयापैकी पूर्ण होत आले आहे. एकीकडे जिल्हा धुरमुक्त व गॅसयुक्त होत असताना दुसरीकडे महिन्याचा केरोसिनचा साठा ४ लाख ५६ हजार लिटर एवढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे मोरे यांनी सांगितले.
-------
जिल्ह्यात २०१६ पासून ८२८ के. एल. रॉकेल कमी झाले. जिल्ह्यातील १३ तालुक्यांची आॅक्टोबर २०१६ मध्ये १३२० के. एल (१ के एल म्हणजे १ हजार लिटर) रॉकेलची मागणी होती. मात्र, आॅक्टोबर २०१८ मध्ये ही मागणी ४९२ के. एल वर आली असून या गेल्या महिन्यात २६४ के. एल रॉकेलचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आॅक्टोबर २०१६ ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत एकूण ८२८ के. एल रॉकेल म्हणजेच ६९ रॉकेलच्या गाड्या कमी झाल्या आहेत.