पाठिंबा हवा तर, ‘मातोश्री’वर या!

By admin | Published: March 27, 2017 04:54 AM2017-03-27T04:54:41+5:302017-03-27T04:54:41+5:30

सत्ताधारी भाजपा व शिवसेनेतील तणाव दूर करण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख

If you want support, then on 'Matoshree'! | पाठिंबा हवा तर, ‘मातोश्री’वर या!

पाठिंबा हवा तर, ‘मातोश्री’वर या!

Next

सुरेश भटेवरा /नवी दिल्ली
सत्ताधारी भाजपा व शिवसेनेतील तणाव दूर करण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले, अशी चर्चा राजधानी दिल्लीत सुरू आहे. तथापि, असे कोणतेही निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुखांना प्राप्त झालेले नाही, असे सांगत स्नेहभोजन राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी असेल तर ही चर्चा व स्नेहभोजन फक्त मातोश्रीवरच होईल, असे शिवसेनेचे राज्यसभेतील प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या संभाव्य निमंत्रणाबाबत बोलताना राऊत म्हणाले, तूर्त तरी हे निमंत्रण केवळ चर्चेत आहे. जर हे निमंत्रण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी असेल तर ही चर्चा व स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल. याचे कारण यापूर्वीच्या दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याची सारी चर्चा मातोश्रीवरच झाली होती. तथापि, शिवसेनाच काय तर एनडीएच्या कोणत्याही घटक पक्षाच्या नेत्याला आजवर माझ्या माहितीनुसार पंतप्रधानांकडून असे निमंत्रण प्राप्त झालेले नाही, असेही राऊत म्हणाले. आजवरच्या दोन राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार असतानाही शिवसेनेने अनुक्रमे प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर देखील भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमधले ताणतणाव अद्याप दूर झालेले नाहीत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभांमधे उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवल्यामुळे भाजपमधे कमालीची नाराजी आहे. शिवसेनेच्या कडवट हल्ल्यांमुळे भाजप वैतागला असून राज्यात लवकरात लवकर उभय पक्षांची युती संपावी अशी काही नेत्यांची मनोमन इच्छा आहे, असे समजले. तथापि याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त न करता अतिशय सावध पवित्रा भाजप नेत्यांनी स्वीकारला आहे.
बहुमताच्या गणितातून चर्चेला वेग
महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्यांच्या सभागृहात भाजपचे १२२ सदस्य आहेत. बहुमतासाठी भाजपला २३ मतांची कमतरता आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण २0 सदस्य आहेत. यापैकी १३ सदस्यांचा पाठिंबा भाजपला आहे. याचा अर्थ आणखी फक्त १0 आमदारांच्या पाठिंब्याची भाजपला आवश्यकता आहे. युती तोडून शिवसेनेच्या ६३ आमदारांच्या पाठिंब्याला तिलांजली देण्यापूर्वी राज्यात अन्य कोणते पर्याय भाजपकडे उपलब्ध आहेत, याची चाचपणी सुरू असतांनाच, पंतप्रधान मोदी ठाकरेंना खास निमंत्रण पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने हा घटनाक्रम अधिकच लक्षवेधी बनला आहे.

स्नेहभोजनाची कल्पना आली कुठून?
मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
बैठकीत राज्य सरकारवर शिवसेनेद्वारे सातत्याने सुरू असलेल्या शरसंधानाची गंभीर दखल घेत अन्य पर्यायांवरही चर्चा झाल्याचे समजले. शिवसेनेबाबत काय तो अंतिम निर्णय पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहांवर सोपविण्यात आला. त्यातूनच स्नेहभोजनाची कल्पना पुढे आल्याचे समजते.
शिवसेनेशी असलेल्या युतीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, २९ मार्चच्या प्रस्तावित स्नेहभोजनासाठी मोदींचे उद्धव ठाकरेंना येऊ घातलेले निमंत्रण, हा उभय पक्षात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी भाजपातर्फे एक महत्त्वाचा (की अखेरचा) प्रयत्न असावा, असे बोलले जाते.
निमंत्रण आले तरी उद्धव ठाकरे जाणार का?
मोदींच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण अद्याप सेनेपर्यंत पोहोचलेले नाही. उद्या-परवापर्यंत ते मिळाले तरी स्वत: उद्धव जाणार का, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. आजवर एनडीएच्या बैठकीला सेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गिते, खा. आनंदराव अडसूळ आदी नेते उपस्थित राहिलेले आहेत.

सेना-भाजपा उभारणार सामंजस्याची गुढी
शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे दोन मंत्री मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा आहे. गुढीपाडव्याला ही भेट घडून येऊन दोन्ही पक्षांत सामंजस्याची गुढी उभारली जाईल, असे सूत्रांकडून समजते.

Web Title: If you want support, then on 'Matoshree'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.