तासगाव पाहिजे तर मिरजेवर पाणी सोडा!
By admin | Published: July 8, 2014 12:38 AM2014-07-08T00:38:32+5:302014-07-08T00:38:32+5:30
कोणी कोणत्या जागा लढवायच्या याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना शिवसेनेने तासगाव-कवठेमहांकाळ हवे असेल तर मिरजेवर पाणी सोडावे लागेल
Next
अतुल कुलकर्णी - मुंबई
कोणी कोणत्या जागा लढवायच्या याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना शिवसेनेने तासगाव-कवठेमहांकाळ हवे असेल तर मिरजेवर पाणी सोडावे लागेल अशी अधिकृत भूमिका सोमवारी जाहीर केल्याने युतीत खळबळ उडाली आहे. हे करत असताना तासगाव-कवठेमहांकाळसह इस्लामपूर, शिराळा, खानापूर-आटपाटी, पलूस-कोरेगाव हे पाचही विधानसभा मतदारसंघ शिवसेनाच लढवेल, असेही शिवसेनेने जाहीर करून टाकले आहे.
या अचानक झालेल्या राजकीय खेळीमुळे गृहमंत्र्यांना पराभूत करण्याची भाषा करणारे व भाजपाच्या तिकिटावर सांगलीतून निवडून आलेल्या खा. संजयकाका पाटील यांच्या मनसुब्यांना जबर धक्का बसला आहे. शिवाय शिवसेनेने आर.आर. पाटील यांना आस्मान दाखवण्याची भाषा करताना त्यांचीच पाठराखण करत राजकीय संदेश दिल्याची चर्चाही रंगली आहे.
सांगलीतील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून विद्यमान गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पाडण्याकरता भाजपाने अजित घोरपडे यांची उमेदवारी घोषित झाल्याच्या बातम्या विविध चित्रवाहिन्यांवरून सुरू झाल्या. त्याचा खुलासा करण्याच्या नावाखाली शिवसेनेचे नेते व पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते दिवाकर रावते यांनी या मतदारसंघावर हक्क सांगत भाजपावर जोरदार राजकीय कुरघोडी केली आहे.
गृहमंत्र्यांना हरविण्याचे काम शिवसेनाच करणार आहे, असे सांगत भाजपा आग्रही असेलच तर मिरज मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडा, असेही रावते यांनी म्हटले आहे. मिरजेतून भाजपाचे सुरेश खाडे गेल्या वेळी 54 हजार मतांनी निवडून आले होते. आर.आर. पाटील आणि अजित घोरपडे यांच्यात असलेल्या राजकीय ‘सख्या’चा फायदा घेत घोरपडेंना भाजपाची उमेदवारी दिल्याच्या बातम्या पसरल्यानेच हा खुलासा केल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे युतीतील बिघाडी पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे.