उत्कृष्ट आमदार व्हायचे तर विधानसभेत उपस्थित राहायला हवे - राज्यपाल रमेश बैस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 09:23 AM2023-06-18T09:23:23+5:302023-06-18T09:23:34+5:30
पुण्याच्या एमआयटी शिक्षण संस्थेने बीकेसी येथील जीओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित केलेल्या तीनदिवसीय राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप शनिवारी झाला.
मुंबई : पूर्वी आमदार विधानसभेत बोलण्यासाठी अभ्यास करून यायचे. मात्र, आता इंटरनेट, गुगलसारखे माध्यम असूनही आमदार तयारी न करताच विधानसभेत येतात. विशेष म्हणजे, ते पूर्णवेळ विधानसभेत बसत नाहीत. एखादे विधेयक मंजूर करायचे झाले तरी व्हीप जारी करावा लागतो. तेव्हा उत्कृष्ट आमदार व्हायचे असेल तर अन्य आमदारांच्याही चर्चेला उपस्थित राहणे, जास्तीत जास्त वेळ विधानसभेत बसणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
पुण्याच्या एमआयटी शिक्षण संस्थेने बीकेसी येथील जीओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित केलेल्या तीनदिवसीय राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप शनिवारी झाला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ते म्हणाले की, बऱ्याचदा अनेक महत्त्वाची विधेयके आणि अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर केला जातो. या विधेयकांचा परिणाम नागरिकांच्या जीवनावर पडणार असतो. त्यामुळे अशा विधेयकांच्या मंजुरीवेळी आमदारांनी चर्चेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. जे नवीन आमदार निवडून येतात त्यांच्यासाठी तीन महिन्यांचे प्रशिक्षण आयोजित करायला हवे. यासाठी एमआयटीने पुढाकार घ्यावा. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल एमआयटीचे प्रमुख विश्वनाथ कराड आणि राहुल कराड यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
आमदारांनी देशहिताला प्राधान्य द्यावे - मुख्यमंत्री
देशात विविध पक्ष कार्यरत आहे. प्रत्येक पक्षाचे आमदार विविध राज्यांतील विधानसभांमध्ये आहेत. आपण वेगवेगळ्या राज्यांतून किंवा पक्षांचे आमदार असला तरी निवडणुकीच्या राजकारणापेक्षा देशाचे हित, सार्वभौमत्वाला प्रत्येकाने प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळेच लोकशाही सक्षम होऊन भारत संपूर्ण विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या संमेलनासाठीही शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
आपण प्रतिस्पर्धी, शत्रू नव्हे - व्यंकय्या नायडू
आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपण प्रतिस्पर्धी आहोत, शत्रू नाही. आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. एखाद्या चुकीच्या गोष्टीसाठी प्रभावीपणे प्रतिकारही केला पाहिजे. पण, त्याचबरोबर आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी सन्मानाने वागायला हवे, असा सल्ला माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आमदारांना दिला.