छोट्या जिल्ह्याचं नाव काय बदलता? महाराष्ट्राचं नाव बदलून...; अबू आझमींचे मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:23 PM2023-01-22T15:23:23+5:302023-01-22T15:23:46+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाज करतो त्याहून अधिक मुस्लीम समाज करतो असं अबू आझमींनी सांगितले.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याची उंची खूप मोठी आहे. छोट्या जिल्ह्याचं नाव बदलणं ठीक नाही. जर करायचे असेल तर महाराष्ट्राचं नाव बदलून संभाजी करा. आम्ही टाळ्या वाजवू. रायगड नावाला अर्थ नाही ते नाव बदला. ठाणे जिल्ह्याचं नाव बदला, नवी मुंबईचं नाव बदला. केवळ मुस्लीम नावे बदलणे हे निवडणुकीपुरते केलेले धुव्रीकरणाची नीती आहे. सरकारमध्ये बसलेले लोक हे करतायेत असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला.
आ. अबू आझमी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जितका आदर इतर समाज करतो त्याहून अधिक मुस्लीम समाज करतो. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात मुस्लिमांसाठी खूप काही केले. ४० टक्के मुस्लीम त्यांच्याजवळ होते. वकील, सुरक्षा रक्षक सर्व मुस्लीम होते. ही लढाई धर्माची नव्हती तर सत्तेची होती. राजा, महाराजांना धर्माशी देणेघेणे नव्हतं. आपली सत्ता, राज्य विस्तारीत करण्यासाठी लढाई लढायचे आणि या लढाया पूर्वी झाल्यात. कुठल्याही लढाईत कोण हरतं तर कोण जिंकते या गोष्टीवर राजकारण करणे चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत हे सरकार विकासाचं राजकारण नाही तर हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करून मुस्लिमांचा चुकीचा इतिहास समोर आणून हिंदूंची दिशाभूल करून यांना सत्तेत यायचे आहे. मी माझे काम करतोय. जे लोक मला धमक्या देतायेत त्यांना सांगतो हा मूर्खपणा करू नका. महाराष्ट्राचा विकास होवो. आपण सगळे भाऊ-भाऊ म्हणून राहू. तुमची मर्जी तुम्हाला काय करायचे ते करा असं प्रतिआव्हान अबू आझमींनी धमकी देणाऱ्यांना दिले.
दरम्यान, औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर हे तीनच जिल्हे आहेत जे मुस्लीमांच्या नावाने आहेत. खूप जुन्या काळापासून हे नाव आहे हे बदलू नये ही आमची भूमिका आहे. त्यातून काही विकास होणार नाही. गरीबी दूर होणार नाही. नाव बदलण्यावरून मोठं नुकसान होईल. नाव बदलल्याने सगळं काही बदलावे लागेल यात खूप खर्च होईल असंही अबू आझमी यांनी म्हटलं.