लढायचं असेल तर ताकदीनं लढा, हे काय...; एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 07:48 PM2022-11-15T19:48:41+5:302022-11-15T19:49:17+5:30
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील असं खडसेंनी म्हटलं.
जळगाव - सत्तेचा दुरुपयोग करत नियमांची तोडफोड करुन राजकारण केलं जात आहे. लढायचं असेल ताकदीने लढा, हे काय घाणेरड्या पद्धतीने बच्चो बच्चो राजकारण तुम्ही खेळताहेत असं म्हणत एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून पुन्हा विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीनंतर एकनाथ खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवायची असल्याचा निर्णय झाला असून यासाठी ४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारांचा आमच्या बाजूने मोठा प्रतिसाद आहे. ४५१ पैकी ४४८ सभासदांची मी स्वत: बोललो आहे. सध्यस्थितीत विरोधकांकडून जे राजकारण चाललं आहे याविषयी जनतेमध्ये मोठी चीड आहे. मंत्री, आमदार खासदार असतांनाही जिल्हा दूध संघ ताब्यात घेण्यासाठी घाणेरडं राजकारण सुरु आहे असं सांगत त्यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला.
तसेच जिल्हा दूध संघात भ्रष्टाचार दिसत असेल, तर फॉरेन्सिक ऑडिट करा, माझी तयारी आहे. यात जे निष्पन्न होईल त्याआधारे कारवाई करा. निवडणुका पाहूनच जिल्हा दूध संघातल प्रकरण समोर आणलं. याला अटक करणं, त्याला अटक करणं, कशाला करताहेत, ताकद असेल ताकदीने निवडणूक लढा असं आव्हान एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलं.
संजय पवार म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी नव्हे
राष्ट्रवादीचे संजय पवार हे विरोधकांकडून जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवित असल्याची चर्चा आहे, यावर एकनाथ खडसेंनी त्यांच मत व्यक्त केले. एकटे संजय पवार हे सोडून गेले म्हणून संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष तिकडे गेला असा अर्थ होत नाहीये. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली. तर यावर बोलतांना माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनीही पवार यांना टोला लगावला आहे. त्याला जिकडे जायंच, जाऊद्या, त्यांना त्यांचे विचार पटले असतील, म्हणून ते गेले असतील, पण राष्ट्रवादीला बदनाम करु नये, असा टोला डॉ सतीश पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा एकसंघ असल्याचे जरी सांगितले जात असले तरी दरम्यान यावरुन जिल्हा संघाच्या निवडणुकीत संजय पवार विरोधकांना जावून मिळाल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे बोलले जात आहे.
गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधी घडलं नाही
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाची व्याख्या कशी ठरवली असे जर म्हटले रोजच अनेकांना धक्का लागतो, हजारो विनयभंगाचे गुन्हे दाखल होतील मात्र जितेंद्र आव्हाड यांना त्रास देण्यासाठी छळ करण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी सत्तेची मस्ती आणि सत्तेचा माज सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात अनुभव येत आहे. अगदी गलिच्छ राजकारण, घाणेरडं राजकारण यापूर्वी महाराष्ट्रात कधी घडलं नाही असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.
शरद पवारांनी आधार दिला
गेल्या चाळीस वर्षापासून एकनाथ खडसे राजकारणात आहे. मला एकटे पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, भाजपने मला उमेदवारी दिली नाही, पण शरद पवार यांनी आधार दिला आहे. मी आमदार आहे, मला काय एकाकी पाडतील, कितीही एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला, तर जनता माझ्यासोबत आहे. यांनी तर जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक बुडवल्या होत्या त्यांचा विकास मी केला, आताही यांचा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत हेतू स्वच्छ नाही. यांना त्यातून काही तरी कमवायचं आहे असा आरोप खडसेंनी विरोधकांवर केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"