मराठ्यांना द्यायचे तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा; अविनाश जाधवांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 05:12 PM2023-11-26T17:12:21+5:302023-11-26T17:12:44+5:30
ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्रातील मराठी भाषा दुकानांवर लिहायला लाज वाटत असेल तर आम्हाला, तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचे नाहीय. - जाधव
मनसेचे सर्व नेते कोकण पदवीधर मतदारसंघात प्रचार करत आहेत. यामध्ये अभिजीत पानसे, अविनाश जाधव आदी आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मराठी पाट्यांवरून मनसेने आंदोलन सुरु केले आहे. आस्थापनांना तीन दिवसांची अखेरची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील मराठा आंदोलनावर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे मुख्यमंत्र्यांनी केंद्रात विनंती करून तात्काळ अधिवेशन बोलावून कोणत्याही प्रकारचा बदल केलातर हे सगळे वाद थांबतील. मराठ्यांना द्यायचे तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा. ते आक्रमक झाले तर तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला. तसेच मराठा समाज आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून यांना राजकारण करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्रातील मराठी भाषा दुकानांवर लिहायला लाज वाटत असेल तर आम्हाला, तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचे नाहीय. अजूनही वेळ गेलेली नाही ताबडतोब पाट्या मराठीत करा. 26 जागा जर भाजप लढवणार असतील तर उरलेल्या जागा काय मनसे लढवणार? असा टोला जाधव यांनी लगावला.
मनसे कोकण पदवीधर व मुंबई पदवीधर निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राज ठाकरेंनी कोणतीही जबाबदारी दिली तर ती पार पाडणार आहे. काही उमेदवार पदवीधर देखील नाहीत. जाणून बुजून पदवीधर निवडणूक जनतेपर्यंत पोहोचवली गेली नाही. बारा वर्षे पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी शिक्षणात काही काम केलंय का? असा सवाल मनसे नेते अभिजित पानसे यांनी उपस्थित केला.