सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:44 PM2023-08-17T17:44:46+5:302023-08-17T17:46:58+5:30
देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही असं पवारांनी म्हटलं.
बीड – आमचा सहकारी पक्ष सोडून दिला, कालपर्यंत ठीक होता. कुणीतरी सांगितले पवारसाहेबांचे वय झालंय, भवितव्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. तुम्ही माझे वय झालंय बोलता पण तुम्ही माझं काय बघितलंय? तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होते हे पाहिलेय, तरुण पिढीच्या मदतीने अनेकांचे पराभव झालांय, सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवायचा प्रयत्न करा. नाही केले तर लोकं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासह इतरांवर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह बघून मला जुन्या काळाची आठवण झाली. लोकांच्यामध्ये राहणारे नेतृत्व, जी निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नसते, बीडची जनता त्यांच्यापाठीमागे शक्ती उभी करते. संदीपने ते दाखवले. अनेक वर्षापूर्वी मी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो. त्यावेळी असा एक प्रसंग आला. महाराष्ट्राचे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांकडे होतो. आम्ही सगळे त्यांच्या विचारधारेने काम करत होतो. तेव्हा खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका काहींनी मांडली. सामान्य लोक अस्वस्थ होते. पण या जिल्ह्यात नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होते. काकूंनी भूमिका घेतली, नेत्यांच्या निष्ठेशी मी तडजोड करणार नाही. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल. मी माघार घेणार नाही. तशी भूमिका त्याकाळात केली. आज तीच स्थिती त्यांच्या नातूने केली याचा मला अभिमान आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही. राजधर्म, भाषा यामधून समाजात अंतर कसं वाढवता येईल याची खबरदारी घेण्याची नीती आजच्या राज्यकर्त्यांची आहे. महागाईचा प्रश्न आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेत. बियाणे-खतांच्या किंमती वाढल्यात. न परवडणारी शेती अशी अवस्था झाली. त्यामुळे काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी अडचणीत आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही असा आरोप शरद पवारांनी केला.