मर्द असाल, तर मला तुरुंगात टाका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 07:03 AM2022-03-26T07:03:23+5:302022-03-26T07:03:53+5:30
शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या; मुख्यमंत्री ठाकरेंचं थेट आव्हान
मुंबई : आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची बदनामी करायची, धाडी घालायच्या, मालमत्तांवर टाच आणायची हे शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या. चला मी तुमच्याबरोबर येतो. मला आधी तुरुंगात टाका, मग पुरावे गोळा करा; पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ठाकरे यांनी काेराेना काळातील भ्रष्टाचार, महापालिकेतील घोटाळे यांना उत्तर दिलेच; पण मंत्री नवाब मलिक यांची जोरदार पाठराखण केली.
मुदस्सर लांबे यांना हार घालून सन्मान करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्यावेळी कदाचित त्यांच्यावरील गुन्ह्याची आपल्याला माहिती नसेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला. लांबे यांच्या पत्रावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची स्वाक्षरी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांनी केले हे प्रश्न...
नवाब मलिक हे दाऊदचा हस्तक होते, तर पाच वेळा ते निवडणुकीत जिंकले तरी केंद्रीय यंत्रणांना ते माहीत नव्हते का? यंत्रणांनी दिवे लावून दाऊदचे हस्तक कोण ते शोधायला हवे होते.
दाऊद कुठे आहे, कुणाला माहीत आहे का? यापूर्वी तुम्ही राममंदिराच्या नावाने निवडणूक लढवली. आता दाऊदच्या नावाने मते मागणार का?
गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरपटत आणण्याची घोषणा केली होती. ओबामांनी घरात घुसून जसा लादेनला मारले तसा दाऊदला घरात घुसून मारण्याची हिंमत कधी दाखवणार?
सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता, तर याच अनिल देशमुख, मलिक यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसला असतात ना?
ज्यावेळी देशातील बहुतांश लोक देशातील सध्याच्या नेतृत्वाचा तिरस्कार करीत होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठराखण केली होती. वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देणार?
मर्यादा ओलांडल्या
टीकेला, बदनामीला आपण जराही घाबरत नाही; परंतु कोणत्या थराला जाऊन बदनामी करायची, तथ्यहीन आरोप करायचे याच्या मर्यादा तुम्ही ओलांडल्या आहेत. एकच गोष्ट सतत सांगितली की, सत्य वाटायला लागते. केंद्रातील या तपास यंत्रणा हे तुमच्या हातातले बाण असून, ते लक्ष्यांच्या छातीत खुपसले जात आहेत. सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये संधी दिली पाहिजे.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
देशात अघोषित आणीबाणी !
देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू असल्यासारखी परिस्थिती आहे. इंदिरा गांधी डरपोक नव्हत्या त्यांनी आणीबाणी घोषित करण्याचे धैर्य दाखवले होते, अशा शब्दांत ठाकरे यांनी देशातील सद्य:स्थितीचे वर्णन केले.
‘यांचा जीव मुंबईत’
रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत आहे. मुंबईसारखे शहर जगात नाही. मी मुंबईकर असल्याचा मला अभिमान आहे, असे ठाकरे म्हणाले.