आग राेखायची तर ‘हे’ करावेच लागेल
By जयंत होवाळ | Published: April 15, 2024 08:36 AM2024-04-15T08:36:37+5:302024-04-15T08:36:51+5:30
संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो.
जयंत होवाळ, विशेष प्रतिनिधी
संपूर्ण भारतात १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १४ एप्रिल १९४४ या दिवशी मुंबईतील व्हिक्टोरिया डॉकमध्ये नांगरलेल्या एस. एस. स्टिकीन या जहाजास लागलेल्या भीषण आगीचा सामना करताना अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवान शहीद झाले होते. त्यानंतरही लोकाचे संरक्षण करताना अनेकांनी बलिदान दिले आहे. प्राणांची आहुती दिलेल्या अग्निशमन दलाचे जवान-अधिकाऱ्यांना १४ एप्रिल या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस अग्निशामक दल दिन म्हणूनही पाळला जातो.
मुंबईची प्रचंड लोकसंख्या, मर्यादित क्षेत्रफळ आणि वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी बांधलेल्या उत्तुंग इमारती, दाटीवाटीची लोकवस्ती, अरुंद रस्ते, झोपडपट्ट्या ही सगळी रचना लक्षात घेता अग्निसुरक्षा ही आव्हानात्मक जबाबदारी आहे. त्यासाठी केवळ अग्निशमन दल कार्यक्षम असून, चालणार नाही तर शहरातील नागरिक, विविध संस्था तेवढ्याच सावध असायला हव्या.
केवळ आगीच्या घटनाच नव्हे तर नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती, एखादी दुर्घटना असली तरी अग्निशमन दलाला धावून जावे लागते. अग्निसुरक्षेच्या बाबतीत शहर आणखी सक्षम व्हावे, यासाठी आणखी पाच नवी अग्निशमन केंद्रे मुंबईत उभारली जाणार आहेत. सध्या शहर व उपनगरे मिळून एकूण सहा प्रादेशिक संदेश केंद्रे कार्यन्वित आहेत, तर ३५ अग्निशमन केंद्रे आहेत. मुंबईतील रहदारीचा विचार करता १९ लघु अग्निशमन केंद्रे मोक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत. आणखी एक लघु अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे.
मुंबईत उत्तुंग टॉवर मोठ्या प्रमाणावर उभे राहत आहेत. तेथील आग विझवणे हे मोठे आव्हान आहे. वाहतूक कोंडी, दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्ट्या आणि अरुंद रस्ते पाहता आगीची घटना घडल्यास दलाच्या वाहनांना तेथे पोहोचण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी २४ फायर बाईक सेवेत आहेत. २२ विभाग कार्यालयात जलद प्रतिसाद वाहनेही तैनात आहेत.
मुंबईचे अग्निशमन दल केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वोत्तम असणे आवश्यक आहे. याचे कारण मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून, राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या इमारती आहेत. त्याचे थोडेसेही नुकसान परवडणारे नाही.
संदेश दळणवळणासाठी अत्याधुनिक यंत्रणेवर आधारित इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल प्रणालीचे मुख्य नियंत्रण कक्ष भायखळा येथे तर उप नियंत्रण कक्ष बोरिवलीत आहे. या सर्व अत्याधुनिक वाहनांचा व साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी मनुष्यबळ आहे. २०२३ मध्ये महिला आणि पुरुष मिळून ४६८ उमेदवारांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. उर्वरित २६८ उमेदवारांच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यास टाळाटाळ केली जाते. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते.