पायरेटेड चित्रपट पाहिल्यास होणार 3 वर्षाची शिक्षा ?
By admin | Published: August 23, 2016 08:43 AM2016-08-23T08:43:15+5:302016-08-23T08:43:15+5:30
चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहणं, डाऊनलोड करणं, त्याची डुप्लिकेट कॉपी बनवण्याचा प्रयत्न करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं
Next
>
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून पायरेटेड चित्रपट पाहत असाल किंवा डाऊनलोड करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चित्रपटाची पायरेटेड कॉपी पाहणं, डाऊनलोड करणं, त्याची डुप्लिकेट कॉपी बनवण्याचा प्रयत्न करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं. असं केल्यास तीन वर्षांचा कारावास तसंच तीन लाखांचा दंड होऊ शकतो.
चित्रपटांची पायरेटेड कॉपी शोधताना तुम्ही ब्लॉक करण्यात आलेल्या वेबसाईट्स पोहोचाल, ज्यानंतर तुम्हाला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून एक चेतावणी मिळेल. ज्यानुसार हा युआरएल मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कॉपीराईट कायद्याअंतर्गत ब्लॉक करण्यात आला आहे. जो आदेशाचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करेल त्याला तीन वर्षांचा कारावास तसंच तीन लाखांचा दंड होऊ शकतो.
जुलै महिन्यात 'ढिशूम' चित्रपटाच्या निर्मात्यांनी न्यायालयात याचिका केली होती. चित्रपटांची ऑनलाइन पायरसी थांबवावी अशी मागणी त्यांनी केली होती. ज्यानंतर न्यायालयाने 134 वेबलिंक आणि युआरल ब्लॉक केले होते.
भारतीय नेटिझन्सना मात्र चिंता करण्याची गरज नाही, कारण ब्लॉक करण्यात आलेल्या वेबसाईटवर क्लिक केला म्हणून लगेच शिक्षा होणार नाही. 'ब्लॉक करण्यात आलेल्या वेबसाईटवर गेल्यामुळे लगेच शिक्षा होणार नाही. मात्र जर तुम्ही वारंवार असं करत असाल आणि पायरेटेड कॉपी मिळवण्यात यशस्वी झालात तर कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते', अशी माहिती ज्येष्ठ वकिल व्यंकटेश धोंड यांनी दिली आहे.