‘इफ्फी’त यंदा दहा मराठी चित्रपट
By admin | Published: October 11, 2016 03:50 AM2016-10-11T03:50:39+5:302016-10-11T03:50:39+5:30
गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया) संपन्न होत
मुंबई : गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आॅफ इंडिया) संपन्न होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षीपासून मराठी चित्रपट पाठविण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी
मांडली आणि ती प्रत्यक्षात
उतरविली. गेल्या वर्षी २० ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत
पणजी येथे पार पडलेल्या ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ९ मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली.
यंदा याच धर्तीवर गोवा येथे होणाऱ्या ४७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी १० चित्रपट निवडण्यात आले आहेत. यात कट्यार काळजात घुसली, नटसम्राट-असा नट होणे
नाही, सैराट, हलाल, कोती, सहा
गुण, बर्नी, डबल सीट, हाफ तिकीट आणि दगडी चाळ या चित्रपटांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिता प्राप्त झालेल्या
२७ चित्रपटांचे परीक्षण केल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १०
मराठी चित्रपटांची निवड केली.
मराठी चित्रपटांमधील कलाकृतीला दर्जेदार आणि उत्तम व्यासपीठ
मिळावे या दृष्टिकोनातून गेल्या वर्षीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट पाठविण्यास प्रारंभ झाला. कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही ३ मराठी चित्रपट राज्य सरकारच्या वतीने पाठविण्यात आले होते. (प्रतिनिधी)