हॉटेलच्या अतिक्रमणाकडेही दुर्लक्ष
By admin | Published: June 9, 2016 03:00 AM2016-06-09T03:00:22+5:302016-06-09T03:00:22+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. व्यावसायिकांना देखभाल शाखा सुरक्षा रक्षकांनी अभय दिले आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याची परवानगी नसलेल्या स्टॉलचालकांनीही अनधिकृत खानावळ सुरू केल्या असून, स्वच्छतेचे सर्व नियमही धाब्यावर बसविले आहेत.
बाजार समितीमध्ये देखभाल शाखा, सुरक्षा रक्षक व प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण घोटाळा झाला आहे. व्यापाऱ्यांनी गाळ्यांवर पोटमाळे व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त हॉटेलचालकांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. धान्य मार्केटमध्ये बाजार समितीने दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हॉटेलचालकांनी व्यापली आहे. काहींनी एक मजल्याचे वाढीव बांधकाम केले आहे. आतापर्यंत बाजार समिती प्रशासनाने वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण कधीच काढलेले नाही. नोटीस देवून तडजोडी केल्या जात असल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे. बिनधास्तपणे मोकळ्या जागेचा वापर करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. येथे तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठी एपीएमसीने परवानगी दिली आहे. परंतु प्रत्यक्षात सर्वांनी अनधिकृत खानावळ सुरू केली आहे. मार्केटमध्ये पश्चिम बंगाल व काही प्रमाणात बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत आहेत. या कामगारांसाठी अनधिकृत खानावळ सुरू झाल्या आहेत. अनधिकृत कँटीनच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असते. प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. त्याच ठिकाणी हे कामगार जेवण करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
फळ मार्केटमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात चार वर्षांपूर्वी प्रशासनाने जोरदार मोहीम सुरू केली होती. अनधिकृत शेड काढले. सिलिंडर जप्त केले होते. हॉटेल चालकांबरोबर प्रशासनाचे मतभेद झाले होते. यामुळेच त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली होती. प्रशासनाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतरही कारवाई होत असल्याने हॉटेलचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी झालेल्या भांडणातून अधिकाऱ्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. परंतु नंतर काही दिवसांमध्ये हॉटेल चालकांचे अतिक्रमण जैसे थे झाले. तेव्हापासून पुन्हा कधीच कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व अतिक्रमणाला अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
>फळ मार्केटमध्ये
सर्वाधिक अतिक्रमण
धान्य मार्केटमध्ये बाजार समितीने दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हॉटेलचालकांनी व्यापली आहे.
बाजार समिती प्रशासनाने वारंवार त्यांना नोटीस दिल्या, परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण कधीच काढलेले नाही.
सर्वाधिक अतिक्रमण फळ मार्केटमध्ये झाले आहे. येथे तयार खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवानगी दिली आहे.