एचआयव्हीबाधितांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष
By admin | Published: August 21, 2016 03:08 AM2016-08-21T03:08:28+5:302016-08-21T03:08:28+5:30
राज्यातील एचआयव्ही बाधित युवकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नसल्याने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या सुमारे तीन लाख युवकांचे जगणे अंधकारमय झाले आहे.
- प्रसाद आर्वीकर, परभणी
राज्यातील एचआयव्ही बाधित युवकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नसल्याने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या सुमारे तीन लाख युवकांचे जगणे अंधकारमय झाले आहे.
येथील होमिओपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अँड सायन्स अकादमीचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक हे एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनासाठी काम करतात. राष्ट्रीय, तसेच महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेकडे एड्सग्रस्तांच्या पुनर्वसनाविषयी त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता, १८ वर्षांवरील एड्स बाधित युवक-युवतींच्या पुनर्वसनासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याचे त्यांना कळविण्यात आले.
शासकीय संस्थांबरोबरच विविध अशासकीय संस्थांच्या माध्यमातून एड्सग्रस्तांसाठी एआरटी केंद्रांतून मोफत उपचार दिला जातो. जिल्ह्याच्या ठिकाणी हे एआरटी केंद्र स्थापन करण्यात आले.
या केंद्रांमुळे एड्सग्रस्तांना जगण्याचे बळ मिळाले असले, तरी पुढील जीवन जगण्यासाठी त्यांची होणारी आबाळ अजूनही थांबलेली नाही. १८ वर्षे पूर्ण झालेल्या एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ तर अंधकारमय असल्याचे सध्याच्या स्थितीतून दिसते.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या एचआयव्ही बाधितांसाठी अनुरक्षागृहे सुरू करण्यात आली. मात्र, अनुरक्षागृहांची संख्या तुलनेने कमी आहे, शिवाय या अनुरक्षागृहात दुर्धर आजाराच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणताही प्राधान्यक्रम नाही. इतर मुलांप्रमाणेच त्यांनाही प्रवेशाचे निकष लावले जातात.
शिक्षणाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. शिक्षण हक्क कायद्यात तरतूद करूनही शासकीय व खासगी शाळांमध्ये एचआयव्ही बाधितांसाठी भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. अशा मुलांना शासकीय वसतिगृहात प्राधान्याने प्रवेश देणे गरजेचे आहे, परंतु या प्रश्नीही तीन वर्षांपासून सामाजिक न्याय विभागाने निर्णय घेतलेला नाही.
लातुरातील ‘हॅपी इंडियन व्हिलेज’चा प्रयोग
होमिओपॅथिक अकादमी आॅफ रिसर्च अॅण्ड चॅरिटीजचे अध्यक्ष
डॉ. पवन चांडक यांनी सांगितले, ‘१८ वर्षे पूर्ण झालेल्या एचआयव्ही संक्रमित विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या कोणत्याही योजना उपलब्ध नसल्या, तरी लातूर येथील सेवालय संस्थेचे संस्थापक रवि बापटले यांच्या पुढाकारातून हसेगाव येथे ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ हा प्रकल्प १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी २० एच.आय.व्ही. संक्रमित मुले वास्तव्याला आहेत. या मुलांना कुक्कुटपालन, वेल्डिंग, कटिंग आदी व्यवसायांचे प्रशिक्षण दिले आहे.