मध्ययुगीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची उपेक्षा

By admin | Published: April 23, 2017 12:49 AM2017-04-23T00:49:31+5:302017-04-23T00:49:31+5:30

जागतिक ग्रंथ दिन : राज्यातील संशोधकांना आव्हान; सहा राज्यांत दीड लाख ग्रंथ

Ignore medieval Marathi manuscripts | मध्ययुगीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची उपेक्षा

मध्ययुगीन मराठी हस्तलिखित ग्रंथांची उपेक्षा

Next

संदीप आडनाईक --कोल्हापूर --आधुनिक व उत्तर आधुनिक तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडावर संशोधित झालेल्या अनेक संदर्भांवर आधारित अनेक कथा-कादंबऱ्यांसह इतर संशोधनपर साहित्याच्या पलीकडेही मराठीचे अस्तित्व आहे, यावर चर्चाही न करणाऱ्या ‘मराठीचा बोलु कवतिके’ म्हणणाऱ्या संशोधक-लेखकांकडून मध्ययुगीन कालखंडातील किमान सहा राज्यांत अस्तित्वात असलेल्या १ लाख ४५ हजारांहून अधिक दुर्मीळ मराठी हस्तलिखित ग्रंथ उपेक्षित असल्याचे चित्र ‘जागतिक ग्रंथ दिना’निमित्त समोर येत आहे.
ग्रंथ, वेद, व्याकरण, कोशशास्त्र, योग, बौद्ध धर्म, जैन धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य अशा विविध विषयांशी संबंधित अनेक संशोधन ग्रंथ सध्या महाराष्ट्रातील संशोधनपर तसेच इतर खासगी संस्थांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये संस्कृत, पाली, प्राकृत व इतर भाषांमधील वाङ्मयाचा समावेश आहे; परंतु त्यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांची सध्या वानवा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करणाऱ्यांनी प्रथम मध्ययुगीन कालखंडातील विविध अप्रसिद्ध वाङ्मय प्रकाशात आणले पाहिजे.
सध्या बडोदा, तंजावर, पुण्यातील भांडारकर संस्था, धुळ्यातील वि. का. राजवाडे यांच्या नावाची संस्था, बिदर, कल्याण, हैदराबाद, धारवाड, ग्वाल्हेर, इंदौर या ठिकाणी अनेक दुर्मीळ हस्तलिखिते पडून आहेत. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत अनेक दुर्मीळ हस्तलिखिते उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्यावर अभ्यास करणारे संशोधक नाहीत. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय पाण्डुलिपि मिशन’चे महाराष्ट्र राज्यासाठीचे केंद्र भांडारकर संस्थेमध्ये हस्तलिखितांच्या नोंदणीचे आणि वैज्ञानिक पद्धतीने जतन करण्याचे काम चालते. या संस्थेकडे अठ्ठावीस हजार हस्तलिखितांचा संग्रह आहे. प्राचीन भारताच्या वाङ्मयीन इतिहासात अभिजात भाषा मानल्या जाणाऱ्या प्राकृत आणि पालीसह अर्धमागधी, महाराष्ट्री, जैन महाराष्ट्री, इ. प्राकृत भाषांतील साहित्याचे संशोधन अस्पर्शित आहे.



महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत बाराव्या शतकातील लाखो हस्तलिखित ग्रंथ अजूनही संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी ओरड करणाऱ्या साहित्यिक, प्राध्यापक, लेखक, संशोधकांनी ही माहिती प्रकाशात आणण्याची जबाबदारी घ्यावी.
- डॉ. गणेश नेर्लेकर-देसाई,
हस्तलिखित तज्ज्ञ,
केंद्रीय मोडी लिपी समिती सदस्य.

अभ्यासकांची वानवा
हस्तलिखितांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ संशोधकांची राज्यातच नव्हे, तर देशभरात वानवा आहे. तमिळनाडू युनिव्हर्सिटीतील तंजावरचे डॉ. विवेकानंद गोपाळ, बडोदा येथील डॉ. वाकणकर आणि कोल्हापुरातील मोडी लिपी समितीचे सदस्य डॉ. गणेश नेर्लेकर-देसाई आणि डॉ. पा. नां. कुलकर्णी एवढेच हाताच्या बोटांवर मोजता येणारे संशोधक या विषयावर अभ्यास करीत आहेत.


कोल्हापुरातील दुर्मीळ हस्तलिखितांचा अभ्यास गरजेचा
कोल्हापुरातील दुर्मीळ हस्तलिखितांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शिवाजी विद्यापीठ, करवीर नगर वाचन मंदिर, शुक्रवार पेठेतील जैन मठ, खासगी मठ, संस्था, मंदिरे तसेच अनेक राजकीय, तसेच राजघराण्यातील व्यक्तींकडे माहितीचा खजिना आहे. त्यांचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे.

Web Title: Ignore medieval Marathi manuscripts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.