आंबेडकर स्मारकाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष

By Admin | Published: March 4, 2017 02:35 AM2017-03-04T02:35:27+5:302017-03-04T02:35:27+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यावरून आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहे

Ignore the reality of the Ambedkar monument | आंबेडकर स्मारकाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष

आंबेडकर स्मारकाच्या वास्तवाकडे दुर्लक्ष

googlenewsNext

नामदेव मोरे,
नवी मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यावरून आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहे. या भांडणामध्ये स्मारकाच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. वास्तविक इमारत हा स्मारकाचा पहिला टप्पा असून तो पूर्ण होण्यास सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. स्मारकामधील कलादालन व वस्तुसंग्रहालयाचे आराखडेही अद्याप तयार झालेले नसून या महत्त्वाच्या कामाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने आराखडे तयार करण्याचे काम हाती घेतले असून स्मारक पूर्ण होईपर्यंत किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विरोध केल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू झाले आहे. रखडलेल्या स्मारकाच्या कामास पूर्णपणे मुंढे जबाबदार नसून त्यांचा संबंध फक्त डोमला मार्बल लावण्यापुरताच आहे. वास्तविक स्मारकाचे काम सुरू झाल्यापासूनच्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकल्यास हे काम रखडण्यास यापूर्वीचे आयुक्त, सत्ताधारी राजकीय पक्ष, विरोधी पक्ष व सर्वच जबाबदार असल्याचे समोर येवू लागले आहे. ६ एप्रिल २०११ ला स्मारक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली होती. काम संपविण्याची मुदत एप्रिल २०१३ निश्चित केली होती. पण स्मारकाच्या रचनेमध्ये वारंवार बदल करण्यात आला व इतर कारणांनी काम रखडू लागले. स्मारक पूर्ण करण्याची मुदत संपल्यानंतरही प्राथमिक कामेही झालेली नव्हती. २०१३ मध्ये काम पूर्ण झाले नसल्याने ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देण्यास सुरवात झाली. शेवटच्या मुदतवाढीचा कालावधी २८ फेब्रुवारी २०१७ ला संपला. ठेकेदाराला दिलेली शेवटची मुदत संपली तरी अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही.
आंबेडकर स्मारक म्हणजे फक्त सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या इमारतीचे काम नाही. सद्यस्थितीमध्ये डोमला मार्बल लावले किंवा मार्बल न लावताच काम पूर्ण झाल्याची घोषणा केली तरी प्रत्यक्षात उद्घाटन करणे किंवा स्मारक जनतेसाठी खुले करणे शक्य होणार नाही. वास्तविक स्मारकामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट वास्तुसंग्रहालय व कलादालन ही आहे. परंतु सहा वर्षांत अद्याप वास्तुसंग्रहालय कसे असावे त्यामध्ये नक्की कशाचा समावेश असावा याविषयी आराखडा तयार झालेला नाही. येथे कलादालन असून त्यामध्ये कशाचा समावेश असणार याविषयी स्पष्टपणे काहीही निर्णय घेतलेला नाही. प्रशासनाने आराखडे तयार करण्यास सुरवात केली आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तो प्रस्ताव सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मंजुरीसाठी येणार व त्यानंतर निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार असून ही कामे पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
>डोमवरील मार्बल बनला प्रतिष्ठेचा मुद्दा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या डोमला मार्बल लावण्याचा मुद्दा लोकप्रतिनिधी व आयुक्त यांनी प्रतिष्ठेचा बनविला आहे. डोमला मार्बल बसविणे योग्य होणार नसल्याच्या मुद्द्यावर तुकाराम मुंढे ठाम आहेत. लोकप्रतिनिधींच्या व नागरिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधींनीही हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला आहे. आयुक्त मनमानी करत असून हेकेखोरपणा सोडण्यास तयार नसल्याचा आरोप केला जात असून भांडणाचा फटका स्मारकाच्या कामावर होवू लागला आहे.
>मुंढे येण्यापूर्वीच झाले पाहिजे होते काम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यास आयुक्तांनी केलेल्या विरोधामुळे स्मारकाचे काम रखडल्याचे भासविले जात आहे. पण प्रत्यक्षात एप्रिल २०११ मध्ये हे काम सुरू झाले आहे. काम संपविण्याची मुदत एप्रिल २०१३ होती. या वेळेमध्ये बांधकाम पूर्ण झाले असते तर वर्तमानस्थितीमध्ये सुरू असलेला वाद झालाच नसता. मुंढे येण्यापूर्वीच काम वेळेवर करण्यास लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अपयश आले असल्याचे वास्तवही लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कामास झालेल्या विलंबाची कारणे
मुख्य वास्तूच्या खालून जाणारी ६०० मीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी स्थलांतर करण्यात लागलेला वेळ
बांधकामासाठी लागणारा रेतीचा तुटवडा
वास्तूच्या मूळ डिझाइनमध्ये वेळोवेळी झालेले बदल
व्हीजेटीआयकडून स्टेजिंग व शटरिंग डिझाइन मंजूर होण्यास झालेला विलंब
५०० मीटर उंचीचा आरसीसी डोम बांधण्याचे काम अवघड असल्याने झालेला विलंब
काम सुरू करण्याचा दिनांक६ एप्रिल २०११
काम पूर्ण करण्याचा दिनांक५ एप्रिल २०१३
मंजूर अंतिम मुदतवाढ२८ फेब्रुवारी २०१७
भूखंडाचे क्षेत्रफळ५७५० चौरस मीटर
बांधकामाचे क्षेत्रफळ२३१० चौरस मीटर
बहुउद्देशीय इमारत८२५ चौरस मीटर
मुख्य हॉल३०० चौरस मीटर
कॉन्फरन्स रूम३७ चौरस मीटर
सर्व्हिस एरिया१७२ चौरस मीटर
व्हीआयपी रूम६४ मीटर
पोडियम गार्डन८२५ चौरस मीटर
खुले सभा मंडप८५६ चौरस मीटर
डोम१३१५ चौरस मीटर
प्रार्थना हॉल३२५ चौरस मीटर
वस्तुसंग्रहालय२६४ चौरस मीटर
कलादालन१३४ चौरस मीटर
वाचनालय११४ चौरस मीटर
वॉटर बॉडी२७५ चौरस मीटर

Web Title: Ignore the reality of the Ambedkar monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.