पद देताना महिलांकडे दुर्लक्ष
By admin | Published: June 13, 2016 01:27 AM2016-06-13T01:27:26+5:302016-06-13T01:27:26+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली जाणारी आंदोलने, कार्यक्रम या सर्वांमध्ये पक्षाच्या नगरसेविका सर्वांत पुढे असतात
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केली जाणारी आंदोलने, कार्यक्रम या सर्वांमध्ये पक्षाच्या नगरसेविका सर्वांत पुढे असतात, त्यांची सभागृहातील कामगिरीही चांगली असताना महापालिकेतील पदे दिली जाताना त्यांचा का विचार होत नाही. त्यांना पदवाटपात न्याय मिळत नाही, अशी व्यथा महिला नगरसेविकांनी रविवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर मांडली.
रविवारी राज ठाकरे पुण्यात आले होते. नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार सकाळी राज ठाकरे यांची रूपाली पाटील, अस्मिता शिंदे, अर्चना कांबळे, आशा साने, युगंधरा चाकणकर, सुुशिला नेटके, संगीता तिकोने आदी महिला नगरसेविकांनी भेट घेतली. या वेळी पक्षाचे इतर पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. मनसेच्या वतीने शनिवारी महापालिकेतील पक्षाच्या गटनेतेपदी किशोर शिंदे यांची, तर स्मार्ट सिटीच्या एसपीव्ही सदस्यपदी रवींद्र धंगेकर यांची निवड केली आहे. यापार्श्वभूमीवर महत्त्वाची पदे देताना महिलांचा विचार होत नसल्याने नगरसेविकांमध्ये असलेली नाराजी ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आली.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांनी मुख्यसभेत ठिय्या आंदोलन करून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध नारेबाजी केली होती. महिला नगरसेविकांना पक्षात न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आता मनसेच्या नगरसेविकांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन हीच भावना व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
>संधी मिळाल्यास चांगले काम
आंदोलनांमध्ये तसेच सभागृहातील मनसेच्या महिला नगरसेविका नेहमी आक्रमक राहिल्या आहेत. संधी मिळाल्यास त्या चांगले काम करून दाखवू शकतील, अशी भावना राज ठाकरे यांच्यापुढे व्यक्त करण्यात आली. ठाकरे यांनी येत्या काळात यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांना दिले. येत्या २९, ३० जून रोजी पनवेल येथे पुणे, नाशिक व ठाणे येथील नगरसेविकांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या वेळी याबाबत खल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.