‘मित्रमंडळ’ भूखंडाबाबत दुर्लक्ष
By Admin | Published: June 6, 2017 01:30 AM2017-06-06T01:30:36+5:302017-06-06T01:30:36+5:30
महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या वतीने जागा पाहणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या वतीने जागा पाहणी करण्यात आली. परंतु त्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली आणि संबंधित विकसकाच्या विरोधात न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला. महापालिकेच्या मालकीचा तब्बल ३५० ते ४०० कोटी रुपयांचा भूखंड संबंधित बांधकाम व्यावसायिकाला मिळवून देण्यासाठी महापालिकांच्या अधिकाऱ्यांचा मोठा हात असल्याचा यावरून स्पष्ट होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली.
मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या भूखंडावर विकसकाने कुंपण घालून अतिक्रमण केले आहे. परंतु याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार टीकादेखील करण्यात आली. त्यानंतरदेखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर विकसकाने तेथील सुमारे २० झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यावर उद्यान विभागाचे अधिकारी तेथे भेट देण्यास गेले. तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले. त्यामुळे उद्यान विभागाने पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. त्यात बाभळीची २० झाडे कापली गेल्याचे दिसून आले. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे कोट्यवधी रुपयांचा भूखंड हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत.
>तब्बल चार महिने डोळेझाक
चौकातील भूखंडावर अतिक्रमण होत असल्याची तक्रार ३१ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १ फेबु्रवारी रोजी महापालिका अधिकाऱ्यांनी जागा पाहणी करून येथे अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तब्बल चार महिने जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विकसकाला पाठबळ मिळाले व जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला असल्याचे जगताप यांनी सांगितले.