मिहान प्रकल्पातील जमिनीवर आयआयएम, एम्स!
By Admin | Published: March 2, 2016 03:30 AM2016-03-02T03:30:41+5:302016-03-02T03:30:41+5:30
आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम), आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि राज्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या नागपुरातील तीनही संस्थांना मिहान
मुंबई : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम), आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (एम्स) आणि राज्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या नागपुरातील तीनही संस्थांना मिहान प्रकल्पातील अनुक्रमे १४३, १५०, आणि ११.६७ एकर जागा सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आयआयएमसाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयास आणि एम्ससाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत केंद्रे शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयास सवलतीच्या दराने ९९ वर्षांच्या कालावधीसाठी ही जमीन देण्यात येणार आहे.
नागपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी मिहान येथील सेक्टर २७ येथील खापरीमधील सुमारे ११.६७ एकर जमीन त्यावरील बांधकाम (आय.टी.आय. वसतिगृह व लगतचे मोकळे क्षेत्र त्यावरील शाळेच्या बांधकामासह) आणि मैदान यांच्यासह सवलतीच्या दराने ९९ वर्षांच्या कालावधीसाठी राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागास हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व मालवाहतूक हब विमानतळ (मिहान), तसेच विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित करण्यासाठी विविध कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मिहान प्रकल्पाची व्याप्ती आणि भरभराट विचारात घेऊन केंद्र शासनातर्फे या ठिकाणी आयआयएम आणि एम्स यासारख्या नामांकित संस्था स्थापन करण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)