‘आयआयएम’ नागपूर की औरंगाबाद?
By admin | Published: December 14, 2014 12:46 AM2014-12-14T00:46:48+5:302014-12-14T00:46:48+5:30
‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) स्थापना नेमकी कुठल्या शहरात होणार, याबाबतच्या निर्णयाची नागपूर व औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. आजच्या तारखेत या शर्यतीत
शासनाचे मौन : अधिवेशनात मुद्दा तापण्याची चिन्हे
योगेश पांडे - नागपूर
‘आयआयएम’ची (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) स्थापना नेमकी कुठल्या शहरात होणार, याबाबतच्या निर्णयाची नागपूर व औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना प्रतीक्षा आहे. आजच्या तारखेत या शर्यतीत नागपूर आघाडीवर असले तरी औरंगाबादचे लोकप्रतिनिधी तसेच उद्योजकांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने मात्र यासंबंधात मौन साधले असून योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरपैकी एका शहराची निवड होण्याची शक्यता आहे. नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी जागेची उपलब्धता आहे. नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला.
दोन्ही शहरांचा दावा
दुसरीकडे औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील स्वतंत्र इमारत देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. शिवाय येथील अब्दीमंडी, करोडी तसेच ‘डीएमआयसी’साठी संपादित केलेल्या जागेचा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात आला आहे.
नागपुरात आजच्या तारखेत ‘व्हीएनआयटी’ सोडले तर मोठे शैक्षणिक केंद्र नाही. ‘ट्रिपल आयटी’, ‘महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी’, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्था अद्याप कागदावरच आहेत. परंतु केंद्र व राज्यातील सत्ताबदलानंतर नागपूरचे राजकीय वजन वाढले आहे. शिवाय येथे दळणवळणाच्या सोयी सहजपणे उपलब्ध आहेत.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच शहर असल्याने उपराजधानीची बाजू उजवी दिसून येत आहे.
दुसरीकडे ‘आयआयएम’ औरंगाबादलाच व्हावे, यासाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री, केंद्रातील विविध मंत्र्यांच्या भेटी घेण्यात आल्या. शैक्षणिक अनुशेष मराठवाड्यातही आहे. येथे राष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक संस्था आली तर परिसराचा विकास होण्यास मदत होईल, अशी भूमिका आहे.
यासंदर्भात रविवारी औरंगाबादमध्ये जनप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे सदस्य, कार्यकर्ते उपोषणाला बसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधिमंडळात गाजणार मुद्दा
‘आयआयएम’नेमके कुठल्या शहरात जाईल, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विचारणा केली असता त्यांनी यावर ठोस उत्तर देण्यास नकार दिला. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. परंतु लवकरच प्रतीक्षा संपेल, असे त्यांनी स्पष्ट केले. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ‘आयआयएम’संदर्भात विधिमंडळात आवाज उपस्थित करण्याचा दोन्ही शहरातील जनप्रतिनिधींचा प्रयत्न राहणार आहे.