'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:56 AM2018-12-15T01:56:21+5:302018-12-15T01:56:57+5:30

‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ यावर राष्ट्रीय कार्यशाळा

Iisis 'effective existence on the Internet is dangerous' | 'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

'आयसिसचे इंटरनेटवरील प्रभावी अस्तित्व धोकादायक'

googlenewsNext

पुणे : दहशतवादाचे स्वरूप आज बदलत आहे. दहशत पसरविण्यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर केला जात आहे. कट्टरतावाद तसेच धार्मिकतेचा प्रसार इंटरनेटद्वारे केला जात आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेचे जमिनीवरील अस्तित्व आज संपुष्टात येत आहे. मात्र, इंटरनेटवर आजही त्यांचे मोठे अस्तित्व आहे. त्यांचे हे वाढते अस्तित्व चिंताजनक आहे, असे प्रतिपादन राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले.

राष्ट्रीय रक्षा अनुसंधान संस्थेच्या (डीआरडीओ) अतिउच्च पदार्थविज्ञान संस्था (एचईएमआरएल) या प्रयोगशाळेतर्फे ‘एक्स्प्लोझिव्ह डिटेक्शन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कुलकर्णी बोलत होते.
याप्रसंगी एचईएमआरएलचे डायरेक्टर के. पी. एस. मूर्ती, आर्मड अ‍ॅन्ड कॉबेक्ट इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. पी. के. मेहता, भोपाळ येथील आयसर संस्थेचे संचालक डॉ. उमापती, एआरडीएचे प्रमुख डॉ. रमण, लष्करी अभियांत्रिकी विद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, की १९९३ पासून देशात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. यात महाराष्ट्र सर्वाधिक होरपळला आहे. गेल्या दशकात पुण्यात तीन वेळा बॉम्बस्फोट झाले आहेत. दहशतवादी हल्ले होण्याआधीच ते थांबविणे हे सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. दहशतवाद्यांतर्फे दहशत पसरविण्यासाठी विविध प्रकारच्या स्फोटकांचा वापर केला जातो. या स्फोटकांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. या स्फोटकांचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधणे गरजेचे आहे. या चर्चासत्रातून या प्रकारच्या संशोधनावर चर्चा होईल. स्फोटके बनविण्याची माहिती इंटरनेटवर सहजासहजी उपलब्ध आहे. याचा वापर करून स्फोटके बनविली जात आहेत. अशा दहशतवाद्यांना थांबविणे, तसेच त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक काम आहे.

दहशतवादी संघटनांकडून प्रेरित झालेल्यांचा शोघ घेणे मोठे आव्हान 
दहशतवादाचा चेहरा आज बदलला आहे. इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे कट्टरपंथीय आपले विचार पसरवीत आहेत. या विचारांनी अनेक तरुण प्रभावित होत आहेत. कुठल्याही संघटनेशी संबंध न ठेवता ते स्वयंप्रेरणेने दहशतवादी कारवाया करीत आहेत. यामुळे त्यांचा शोध घेणे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. फ्रान्समध्ये याचे प्रमाण जास्त आहे. येत्या काळात भारतातही अशा कारवाया होण्याची शक्यता आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.

२५ प्रकारच्या स्फोटकांचा शोध घेणाऱ्या भारतीय बनावटीच्या ओआरएक्स रिव्हेलेटरचे अनावरण
डीआरडीओ आणि एचईएमआरएलच्या शास्त्रज्ञांनी अतिउच्च दर्जाची स्फोटके बनविण्यासाठी ‘ओआरएक्स रिव्हेलेटर’ ही यंत्रणा तयार केली आहे. याद्वारे २५ वेगवेगळ्या स्फोटकांचा शोध घेतला जाऊ शकतो. विमानतळ, बसस्थानक तसेच आदी ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येणार आहे. तसेच मोठी घटना होण्याआधीच ती थोपविणे शक्य होणार आहे. या यंत्रणेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दहशतवाद हा सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. अत्याधुनिक स्फोटकांचा आज मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ही स्फोटके शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. विमानतळ, बसस्थानक, प्रवासी जहाजे, तसेच मोठे कंटेनर या ठिकाणी स्फोटके तपासण्यासाठी अतिउच्च दर्जाची यंत्रणा आवश्यक असते. या कार्यशाळेत यावर चर्चा होईल आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील.
- डॉ. पी. के. मेहता, प्रमुख,
आर्मड अ‍ॅन्ड कॉबेक्ट इंजिनिअरिंग

भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताचे शेजारी हे मैत्रीपूर्ण नाहीत. यामुळे देशाला आर्थिक प्रगती साधताना अनेक अडथळे येतात. देशात अशांतता पसरविण्यासाठी अनेक घटक कार्यरत आहेत. त्यात दहशतवादी आघाडीवर आहेत. प्लॅस्टिक बॉम्ब, पेट्रोकेमिकल्ससारख्या स्फोटकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे त्यांचा शोध घेण्याची प्रभावी यंत्रणा हवी. या कार्यशाळेत सुरक्षा यंत्रणा, शास्त्रज्ञ, तसेच प्रशासकीय यंत्रणा यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. के. पी. एस. मूर्ती, डायरेक्टर, एचईएमआरएल

Web Title: Iisis 'effective existence on the Internet is dangerous'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.