‘आयआयटी मुंबई’ला सर्वाधिक पसंती!

By admin | Published: July 10, 2015 03:32 AM2015-07-10T03:32:59+5:302015-07-10T03:32:59+5:30

आयआयटीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील सर्वोत्तम हजार विद्यार्थ्यांमधील २७३ विद्यार्थ्यांनी देशातील १८ आयआयटीमधून मुंबई आयआयटीला पसंती दर्शवली आहे

'IIT Mumbai' most liked! | ‘आयआयटी मुंबई’ला सर्वाधिक पसंती!

‘आयआयटी मुंबई’ला सर्वाधिक पसंती!

Next

मुंबई : आयआयटीच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील सर्वोत्तम हजार विद्यार्थ्यांमधील २७३ विद्यार्थ्यांनी देशातील १८ आयआयटीमधून मुंबई आयआयटीला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे देशातील दिल्ली आणि मद्रास या नामांकित आयआयटीला मागे टाकत मुंबई आयआयटीच सरस असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मुंबईनंतर दिल्ली आयआयटीला सर्वोत्तम हजारांमधील १९४ विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे. देशातील १८ आयआयटींपैकी सर्वाधिक कोर्स आणि जागा खरगपूर आयआयटीमध्ये आहेत. मात्र या यादीत खरगपूर आयआयटी पाचव्या स्थानावर आहे. पहिल्या हजारांमधील केवळ १०७ विद्यार्थ्यांनी खरगपूरला पसंती दिली आहे. यंदा २५ हजार विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात आयआयटी खरगपूर आणि मद्रासला सर्वाधिक अर्ज मिळाले आहेत. खरगपूरमध्ये एका जागेसाठी सरासरी १८६, तर मद्रासमध्ये १८३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली आयआयटीच्या एका जागेसाठी सरासरी १६४ व मुंबई आयआयटीला १६१ अर्ज आले आहेत.
आयआयटीमधील कॉम्प्युटर सायन्स आणि अभियांत्रिकी शाखेसाठी सर्वाधिक अर्ज करण्यात आले आहेत. या शाखेच्या देशातील एकूण ९९० जागांपैकी प्रत्येक जागेसाठी सरासरी २०९ विद्यार्थ्यांप्रमाणे एकूण २ लाख ७ हजार ३२० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजेच १४ हजार ४९८ अर्ज आयआयटी मुंबईमध्ये करण्यात आले आहेत.
इलेक्ट्रीकल आणि मॅकेनिकल या दोन्ही इंजिनीअरिंगच्या शाखांसाठी विद्यार्थ्यांनी मुंबईलाच पसंती दिल्याचे आकडेवारीवरून दिसते. इलेक्ट्रीकलच्या देशातील १,१७२ जागांपैकी प्रत्येक जागेसाठी सरासरी १८२ प्रमाणे १ लाख ९७ हजार ३२६ अर्ज आले आहेत. त्यात एकट्या मुंबई आयआयटीसाठी केलेल्या अर्जांची संख्या १४ हजार ३०५ इतकी आहे. मॅकेनिकल इंजिनीअरिंगच्या शाखेसाठी देशातील १७६ जागांसाठी एकूण २ लाख ६ हजार ७१४ अर्ज प्राप्त झाले. त्यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार ११३ अर्ज हे मुंबई आयआयटीलाच आले आहेत. मुंबई आयआयटीमध्ये सरासरी एका जागेसाठी १७६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

Web Title: 'IIT Mumbai' most liked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.