प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मुंब्य्रातील एज्जाज आयएएस
By admin | Published: June 3, 2017 06:26 AM2017-06-03T06:26:28+5:302017-06-03T06:26:28+5:30
वडिलांप्रमाणे देशाची सेवा करायची, या जिद्दीने झपाटलेल्या मुंब्य्रातील एज्जाज अहमद याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची सलग सहा वेळा
कुमार बडदे/लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : वडिलांप्रमाणे देशाची सेवा करायची, या जिद्दीने झपाटलेल्या मुंब्य्रातील एज्जाज अहमद याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची सलग सहा वेळा परीक्षा दिली. यात हार न मानता जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर अखेर तो सहाव्या वेळी देशात ६९७ वा क्र मांक मिळवून उत्तीर्ण होऊन आयएएस झाला. आयएएस झालेला तो मुंब्य्रातील पहिला विद्यार्थी आहे. येथील रशीद कम्पाउंड परिसरात राहणाऱ्या एज्जाजने बारावीपर्यंतचे शिक्षण मुंब्य्रात घेतले. त्यानंतर, पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतरचे शिक्षण इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमधून घेतले. एज्जाजचे कुटुंब मोठे आहे. पाच बहिणी आणि तीन भावांमध्ये तो आठवा आहे. त्याच्या इतर भाऊ, बहिणीचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्याचे वडील मोहम्मद समिउल्ला ३२ वर्षे भारतीय लष्करामध्ये होते. लेफ्टनंट कॅप्टन या पदावर असताना ते सेवानिवृत्त झाले. आयएएस होण्याच्या त्याच्या इच्छेला त्याचे वडील तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी नेहमी पाठिंबा दिला. शिक्षणाच्या खर्चाचा पूर्ण बोजा वडिलांवर पडू नये, यासाठी एज्जाजने आयएएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे दिल्लीत क्लास घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांतून स्वत:च्या शिक्षणाचा बहुतांश खर्च उचलल्याची माहिती त्याने दिल्लीहून लोकमतशी बोलताना दिली.
देशासाठी काहीतरी करण्यासाठी आयएएस बनण्याची एज्जाजची लहानपणापासून इच्छा होती. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर अखेर त्याने ती पूर्ण केली. यामुळे आमचे कुटुंबीय आनंदी आहेत.’
-इक्बाल अहमद, एज्जाजचा भाऊ