नाशकात बेकायदेशीर गर्भपात केंद्र ; डॉक्टरला अटक; हॉस्पिटल सील
By admin | Published: February 20, 2017 07:42 PM2017-02-20T19:42:28+5:302017-02-20T19:42:28+5:30
मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळानाका परिसरात असलेल्या एका रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भपात केंद्र
नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळानाका परिसरात असलेल्या एका रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भपात केंद्र व गर्भलिंगनिदान केंद्रावर महापालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली. दरम्यान, संशयित डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. महमार्गाला लागून असलेल्या शिंदे रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान चाचण्या केल्या जात असल्याची बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली होती. यानुसार वैद्यकिय आरोग्यधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी संशयित डॉ. बळीराम निंबा शिंदे यांच्याविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, डॉ. बी. एन. शिंदे यांना पोलिसांनी अटक केली असून जिल्हा व सत्र न्यायालयाने २५ फेबु्रवारीपर्यंत शिंदे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी, देकाटे यांनी रुग्णालयाला भेट देऊन शिंदे यांची चौकशी केली असता त्यांनी चौकशीमध्ये सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांचा संशय बळावला अधिक तपासणी केली असता रुग्णालयाची परवानगी न घेता रुग्णालय सुरू करून त्यामध्ये आॅपरेशन थिएटरदेखील कार्यान्वित करण्यात आल्याचे आढळून आले. सदर हॉस्पिटल हे नर्सिंग होम अॅक्टनुसार नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले.यावेळी हॉस्पिटलचे डॉ. शिंदे यांचेसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याशिवाय, पथकाने या महिलेवर उपचार करणारे डॉ. विजय थोरात, भूलतज्ज्ञ डॉ. विजय पिचा,डॉ. सचिन जाधव यांचीही चौकशी करुन जाबजबाब नोंदविले आहेत.
बीडनंतर नाशकात प्रकार उघडकीस---
शिंदे यांच्या वैद्यकीय पदव्यांबाबतही महापालिकेच्या पथकाला शंका आहे़ परळी बीड येथील डॉ़ मुंढे प्रकरणानंतर अवैध गर्भजलचिकित्सा व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची विशेष शोध मोहीम घेऊन कारवाई केली जात असतानाच नाशिकमध्ये सदर प्रकरण समोर आले.पथकाला गर्भपात केलेली सदर महिला रुग्णही त्याठिकाणी उपचार घेताना आढळून आली. या प्रकरणी महिला रुग्णाच्या नातेवाईकांचेही जबाब नोंदविण्यात आले असून रुग्ण महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले.
महिलेचा केला गर्भपात....
एका महिलेच्या गर्भाच्या लिंगाचे निदान करुन त्या महिलेला गर्भपात करुन घेण्याचा सल्ला शिंदे यांनी देत गर्भपात करुन पुरावे नष्ट केल्याचा आरोप संशयित शिंदे यांच्यावर आहे. देकाटे यांच्या फिर्यादीवरुन मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक प्रणिता पवार करीत आहेत.