बेकायदेशीर कृत्य केले नाही
By admin | Published: October 17, 2015 03:13 AM2015-10-17T03:13:37+5:302015-10-17T03:13:37+5:30
कॉसमॉस ग्रुपच्या काही प्रकल्पांमध्ये जी काही अनियमितता आहे, ती मी स्थायी आणि महासभेच्या माध्यमातून उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला
ठाणे : कॉसमॉस ग्रुपच्या काही प्रकल्पांमध्ये जी काही अनियमितता आहे, ती मी स्थायी आणि महासभेच्या माध्यमातून उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, परमार यांच्या चिठ्ठीत काही राजकारण्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणात मी कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचा दावा महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केला आहे. परंतु, अद्याप सुसाइड नोटमधील गोल्डन गँगसह इतर राजकारण्यांच्या नावांसंदर्भातला फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येण्याआधीच मुल्ला यांनी केलेल्या या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून पोलिसांनी आता त्यांच्या या पत्रातील दाव्याची तपासणी सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नजीब मुल्ला यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना दिलेल्या निवेदनातील या दाव्यामुळे अनेक तर्कवितर्क आता रंगू लागले आहेत. कॉसमॉस, होरायझन या प्रकल्पात आजही अनियमितता असल्याचा दावा त्यांनी या निवेदनात केला आहे. हा प्रकल्प म्हाडाच्या योजनेन्वये केला असून त्यांच्या नियमानुसार खाजगी विकासकाला असा प्रकल्प आणता येत नाही. परंतु, तत्कालीन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांचे बंधू यामध्ये भागीदार असल्याने त्यांनी या प्रकल्पाला परवानगी दिली होती, असे त्यात म्हटले आहे.
बांधकाम सुरू करण्याआधीच म्हाडाबरोबर करार करणे गरजेचे असते. तसेच प्लिंथ सर्टिफिकेटचेही उल्लंघन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे हा विकासक प्रतिष्ठित व्यक्ती असून त्याची मोठी गुंतवणूक असल्याने त्याने म्हाडाशी संपर्क साधला होता. पण त्यांनी उत्तर न दिल्याने आम्ही प्लिंथ सर्टिफिकेट देत आहोत, असे नोंदवून पालिकेने या प्रकल्पाला परवानगी दिली. हाच मुद्दा आपण महासभेत उपस्थित केला होता. याशिवाय, अनेक बाबींमध्ये यात अनियमितता असल्याने या प्रकल्पाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला होता. केवळ, ठाणे महापालिकेचा फायदा व्हावा आणि ठाणेकरांच्या हितासाठी आपण हे केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)