कोल्ड्रींक्समध्ये आढळले बेकायदेशीर अल्कोहोल
By admin | Published: January 25, 2017 04:21 PM2017-01-25T16:21:27+5:302017-01-25T16:22:06+5:30
शहरात कोल्ड्रींक्समध्ये अल्कोहोल मिसळून विकण्याच्या प्रकाराबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर याची गंभीर दखल घेतली.
Next
>ऑनलाइन लोकमत/अमित सोमवंशी
सोलापूर, दि. 25 - शहरात कोल्ड्रींक्समध्ये अल्कोहोल मिसळून विकण्याच्या प्रकाराबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर याची गंभीर दखल घेतली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन कोल्ड्रींक्स कारखान्यांवर छापा टाकून सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.
शहरात रासायनिक ताडीनंतर कोल्ड्रींक्स मध्ये अल्कोहोलचा वापर विक्रीने उच्चांक गाठला आहे. केवळ अन्न व औषध खात्याच्या परवान्यावर कोल्ड्रींक्स उत्पादन होत असून, ही कोल्ड्रींक्स प्राशन केल्यावर गुंगी येतेच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अन्न व औषध कायद्यानुसार उत्पादनाच्या लेबलवर पदार्थामध्ये कोणते घटक आहेत, याची माहिती देणे बंधनकारक असताना दिशाभूल केली जात होती.
शहरातील सहा मान्यताप्राप्त ताडी दुकाने बंद झाल्यावर रसायनयुक्त ताडी विक्रीचा धुमाकूळ सुरू आहे. तसाच प्रकार कोल्ड्रींक्सचा आहे. यापूर्वी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्पादन व विक्रीच्या ठिकाणी छापे मारले होते. पण परवानाधारकांनी अन्न व औषध प्रशासनाकडून शीतपेय विक्रीचा दाखला सादर करून बचाव करून घेतला. वास्तविक बिअर, दारू उत्पादनावर शासन मोठ्या प्रमाणावर कर आकारते. पण कोल्ड्रींक्स मात्र या कायद्याच्या कचाट्यातून कशी सुटली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शीतपेय उत्पादन व विक्रीसाठी शासनाला एक रुपयाही महसूल न देता मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. कोल्ड्रींक्स कोणते घटक मिसळले जातात, ही बाब अंधारात ठेवण्यात आली आहे. कोल्ड्रींक्स प्राशन केल्यावर गुंगी येते, असे प्राशन करणाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे यात कोणतातरी मादक पदार्थ किंवा अल्कोहोल मिसळला जात असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त बीअरच्या बाटल्यांमधून कागदी लेबल लावून कोल्ड्रींक्स विक्री केली जात होती.
अमली पदार्थाची विक्री याबाबत मागील आठवडयात मालिका प्रसिध्द करुन हा प्रकार चव्हाटयावर आणला होता. त्या नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर व त्यांच्या पथकाने नवरंग ड्रिंक्स आणि श्री स्टार ड्रिंक्स या दोन कंपनीवर छापा मारला. त्यावेळी तेथील कोल्ड्रिंकची तपासणी केली असता त्यात अल्कोहोल सापडले. त्यानंतर राज्य उत्पादन विभागाने दोन कंपनीतील सुमारे ३०० बाटल्या कोल्ड्रिंक्स व कारखान्यातील मशीन जप्त केले. तसेच दोन्ही कंपनीच्या मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी सांगितले.
अनेक दुकानावर छापे...
त्या दोन कंपनीने कोणत्या दुकानदाराला कोल्ड्रिंक्स विकले त्या दुकानावर छापा मारुन तेथील माल जप्त करण्याची कारवाई सुरू होती. तसेच दोन कंपनीतील कागदपत्रे व रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले. जप्त केलेले रसायन पुण्यातील विभागीय प्रयोग शाळेकडे तपासणी पाठविण्यात आले आहे.
अशी तयार केली कोल्ड्रींक्स...
साखर पाणी, इस्ट व सोनामुखी ज्येष्ठ मध असे पदार्थ टाकुन कोल्ड्रींक्स तयार होते.