कोपर्डीच्या मुळाशी अवैध दारू - मुख्यमंत्री
By admin | Published: October 3, 2016 05:52 AM2016-10-03T05:52:30+5:302016-10-03T05:52:30+5:30
कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या मुळाशी अवैध दारू असून, नराधमांनी अवैध दारू प्राशन करून ते भयानक कृत्य केले आहे.
मुंबई : कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या मुळाशी अवैध दारू असून, नराधमांनी अवैध दारू प्राशन करून ते भयानक कृत्य केले आहे. या नराधमांना फाशी होईलच; मात्र या अवैध दारू विरोधातील मोहीम यशस्वी करणे ही त्या पीडितेला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी षण्मुखानंद सभागृहात बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘आपले सरकार’ उपक्रमाअंतर्गत विविध सेवांचे लोकार्पण आणि योजनांचा शुभारंभ करण्यात आला. सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ३७० सेवा आॅनलाइन करणे, मुंबईत ४,७१७ सीसीटीव्हीच्या निगराणीचे लोकार्पण तसेच अवैध दारूनिर्मिती आणि विक्री विरोधातील मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गावोगावी ज्या अडचणी आहेत त्याच्या पाठीमागे अवैध दारूचा मोठा वाटा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील या अवैध दारूविरोधात मोहीम आखण्याची सूचना केली होती. अवैध दारूविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असली तरी राज्याचा विस्तार पाहता ती पुरेशी नाही. अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन गावांपासून दूर आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करुन अवैध दारूच्या विरोधात मोहिमेची सुरुवात करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
२०१८ पर्यंत संपूर्ण राज्य डिजिटल
डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील सर्व गावे डिजिटल कनेटिव्हिटीने जोडण्यात येतील. स्मार्ट सिटीप्रमाणेच राज्यातील सर्व खेडी स्मार्ट बनवू आणि महाराष्ट्राला देशातील पहिले डिजिटल राज्य बनविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आॅनलाईन सेवांमुळे प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता व कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. सेवा हमी कायद्यामुळे जनतेला सेवा हक्क तर प्रशासनावर वेळेत सेवा देण्याची जबाबदारी पडली आहे. आपले सरकार वेब पोर्टलच्या माध्यामातून तत्काळ तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमामुळे नागरिकांना एकत्रित सेवा देणारा डिजिटल प्लॅटफार्म उपलब्ध झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत १२०० वाय-फाय स्पॉट
मुंबईत १२०० ठिकाणी वाय-फाय स्पॉट तयार करण्यात येणार असून १ मे पर्यंत मुंबईकरांना वायफाय सेवा पुरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (प्रतिनिधी)
>मुंबईला तिसरा डोळा
मुंबईत १,५१० ठिकाणी उच्च
दर्जाचे ४,७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याद्वारे निगराणीच्या कामाचे आज
लोकार्पण झाले आहे.
या प्रकल्पामुळे मुंबईची सुरक्षितता अधिक बळकट होणार असून, पोलीस दलाला तिसरा डोळा मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.