महाराष्ट्राच्या बाटलीत दमणची अवैध दारू
By Admin | Published: March 11, 2016 02:25 AM2016-03-11T02:25:55+5:302016-03-11T02:25:55+5:30
डहाणूलगत असलेल्या गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून महाराष्ट्रातील नामवंत
शौकत शेख, डहाणू
डहाणूलगत असलेल्या गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून महाराष्ट्रातील नामवंत कंपनीचे लेबल असणाऱ्या रिकाम्या बाटलीत दमणची त्याच कंपनीच्या नावाची बनावट दारू भरून ती एका कारखान्यात सीलबंद करून राज्यात महागड्या भावाने विकण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बनावट मद्याची अदलाबदल करून सीलबंद करण्याचा कारखाना अद्यापही पोलीस व उत्पादनशुल्क अधिकाऱ्यांना सापडत नसल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
पालघर जिल्ह्याच्या शहरी ग्रामीणसह खेडोपाड्यात राज्य उत्पादनशुल्क तसेच पोलीस प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटक, तामीळनाडू तसेच मद्रासहून खास दारू बनविण्यासाठी आणलेल्या काळ्या गुळाला महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे बोगस बिल लावून गायी, म्हशींना खाण्याच्या खाद्याच्या नावावर त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. त्यामुळे गाव, खेड्यापाड्यात गावठी दारूच्या हातभट््यांच्या व्यवसाय जोरात सुरू आहे. शिवाय डहाणूपासून केवळ १८ कि.मी. अंतरावर गुजरात राज्याची हद्द सुरू होत असल्याने दमण येथील अवैध दारु मोठ्या प्रमाणात बोर्डी-डहाणू, उधवा-तलासरी मार्गाने मुंबई-अहमदाबाद नॅशनल हायवेवरून महाराष्ट्रात आणली जाते. त्यामुळे दररोज शासनाचे लाखोंचे महसूल बुडत आहे.
विशेष म्हणजे पोलीस प्रशासन केवळ देखावा करण्यासाठी महिन्यातून एक दोन वेळा दमण दारु पकडून गुन्हा दाखल करीत असते. परंतु मोठमोठ्या वाहनातून रोज दमणची दारू पास करण्यासाठी पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाना मोठा हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात तिची विक्री होते. शासनाचा महसूल बुडवून दमण बनावटीची दारू खरेदी करून अवैधरित्या महाराष्ट्रात पुरवठा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी डहाणू येथे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागचे लहानसे कार्यालय आहे.