अवैध सावकारी; पुत्रांसह पित्यावर गुन्हा
By Admin | Published: March 4, 2017 02:00 AM2017-03-04T02:00:08+5:302017-03-04T02:00:08+5:30
मालेगाव तालुक्यातील घटना; परवानाविनाच सुरु होती सावकारी.
मालेगाव (वाशिम), दि. ३- अवैध सावकारीच्या आरोपावरून मालेगावातील दोन पुत्रांसह पित्यावर ३ मार्च रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या चौकशी अहवालावरून सदर गुन्हे दाखल झाले आहेत.
चांडस येथील नीलेश सत्यनारायण चौधरी यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे मालेगाव शहरातील सोहनलाल बंकटलाल काबरा यांच्या विरोधात अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सहकारी संस्थेचे सहायक निबंधक परशराम तुकाराम सरकटे यांनी चौकशी केली होती. या चौकशीत तथ्य आढळून आल्याने सरकटे यांनी शुक्रवारी मालेगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले, की चौकशीत सावकारीचा परवाना नसताना सौहनलाल काबरा, त्यांचा मुलगा सुनील काबरा व अनिल काबरा हे ३ डिसेंबर २0१६ पासून परिसरातील लोकांकडून कोरे धनादेश व जमिनीच्या खरेदी करून त्या अडकन ठेवत असल्याचे तसेच ५ ते १0 टक्के दराने व्याजाने पैसे देऊन अवैध सावकारी करीत असल्याचे आढळून आले आहे. सहायक निबंधकांच्या या चौकशी अहवालावरून त्या तिघांवर महाराष्ट्र सावकारी कायदा २0१४ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली.