गृहराज्यमंत्र्यांच्या नावे अवैध वाळूवाहतूक!
By admin | Published: June 25, 2016 03:49 AM2016-06-25T03:49:32+5:302016-06-25T03:49:32+5:30
गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांचे छायाचित्र वापरून अवैध वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी येथील तहसीलदार मुकेश कांबळे यांनी ताब्यात घेतला. कायदेशीर कारवाईसाठी हा ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला
पाटोदा (जि. बीड) : गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांचे छायाचित्र वापरून अवैध वाहतूक करणारा ट्रक गुरुवारी येथील तहसीलदार मुकेश कांबळे यांनी ताब्यात घेतला. कायदेशीर कारवाईसाठी हा ट्रक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला; परंतु २४ तासानंतरही कारवाई झाली नाही.
सौताडा येथील घाटामधून पाटोद्याकडे जात असताना तहसीलदार कांबळे यांना ट्रकमध्ये वाळू असल्याचे आढळले. जिल्ह्यात १५ वाळूपट्टे असून, अद्याप एकाचीही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे वाळू उपसा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मात्र वाळू नेली जात असल्याने कांबळे यांना शंका आली. त्यांनी ट्रक थांबविल्यावर चालक व ट्रकमधील इतर मजूर पळून गेले. त्यामुळे ही वाळू अवैध असल्याचे निदर्शनास आले. मात्र ट्रक ताब्यात असल्याची साधी नोंदही पोलीस दफ्तरी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी म्हणाले, तहसीलदारांनी ट्रक पकडल्यानंतर त्यांना स्वतंत्र कारवाईचे अधिकार आहेत. मात्र, ट्रकमालकाने दंड न भरल्याने ट्रक पोलिसांकडे दिला असावा. पोलिसांनी कारवाईस का टाळाटाळ केली, हे माहीत नाही.
पकडलेल्या ट्रकवरील क्रमांकही अस्पष्ट आहे. समोरील नंबर प्लेटवरील आकडे ओळखू येत नाहीत. पाठीमागे व बाजूला स्पष्ट आकडे असून, ट्रकवर कार्तिक सँड सप्लायर व कामरगाव असा उल्लेख आहे. (प्रतिनिधी)