फटाक्यांची बेकायदा विक्री
By admin | Published: October 20, 2016 01:37 AM2016-10-20T01:37:51+5:302016-10-20T01:37:51+5:30
अग्निशामक विभागातर्फे देण्यात येणारा ना हरकत दाखला तपासूनच फटाका स्टॉलला परवाना दिला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पिंपरी : अग्निशामक विभागातर्फे देण्यात येणारा ना हरकत दाखला तपासूनच फटाका स्टॉलला परवाना दिला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर, पोलीस कोणत्याही ना हरकत प्रमाणापत्राशिवाय परवाना देत असल्याचे अग्निशामक विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही विभागाचा समन्वय नसल्याने शहरातील बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करीत अनेक अनधिकृत स्टॉल उभारण्यास सुरवात झाली आहे.
पुढील आठवड्यात दिवाळी येऊन ठेपल्याने पिंपरी बाजारपेठेसह शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर फटाके विक्रीचे स्टॉल थाटायला सुरुवात झाली आहे. विक्रेत्यांना अग्निशामक विभागातर्फे ना हरकत दाखला आणि पोलिसांचीदेखील परवानगी घेतल्यानंतरच स्टॉल उभारणे बंधनकारक आहे. अग्निशानक विभागाकडून १ नोव्हेंबरपर्यंत ना हरकत दाखला देण्यात येणार असून, पोलिसांतर्फे ३ नोव्हेंबरपर्यंत दुकान थाटण्याचे परवाने देण्यात येणार आहेत. दरम्यान, पोलीस ठाण्यांमध्ये अग्निशामक विभागाकडून देण्यात येणारा ना हरकत दाखला तपासूनच स्टॉल उभारण्याचा परवाना देणे अपेक्षित आहे. तर अग्निशामक विभागातर्फे परवाना देताना विक्रेत्यांचा स्टॉल मोकळ्या जागेत उभारणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
>वर्दळीच्या ठिकाणी थाटली दुकाने
विशेष म्हणजे वर्दळीच्या आणि नागरी वसाहत असलेल्या ठिकाणीदेखील दुकाने थाटात आहेत. काही व्यावसायिकांनी इतर वस्तुंच्या दुकानाबाहेर तात्पुरता मंडप उभारून फटाका स्टॉल उभारण्यास सुरवात केली आहे. असे असतानादेखील पोलीस ना अग्निशामक विभागातर्फे कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाहीये. पिंपरी बाजारपेठेत दिवाळी सणासाठी आतापासूनच खरेदीसाठी गर्दी सुरू झाली आहे. जर बेकायदा फटाके विक्रीच्या दुकानांमुळे दुर्घटना उद्भवली, तर अग्निशामकच्या वाहनालादेखील अडचणींचा सामना करावा
लागणार आहे.