आलिशान मोटारींतून अवैध वाहतूक
By admin | Published: August 4, 2016 01:29 AM2016-08-04T01:29:33+5:302016-08-04T01:29:33+5:30
कासारवाडी येथील नाशिक फाटा येथून पुणे-नाशिक मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
पिंपरी : कासारवाडी येथील नाशिक फाटा येथून पुणे-नाशिक मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचा धंदा जोरात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील अवैध वाहतुकीचा मुद्दा गाजत असताना आता पुणे-नाशिक महामार्गालाही अवैध वाहतुकीचे ग्रहण लागले आहे. हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलिसांचे कार्यालय असताना अवैध वाहतूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या आलिशान मोटारी, जीप तसेच खासगी बसगाड्यांमधून ही वाहतूक केली जात आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या बसला पुणे ते नाशिक प्रवासासाठी २२७ रुपये तिकीट आहे. आलिशान गाड्यांचे कारण देत प्रवाशांकडून ३०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. काही वाहनचालकांकडून जास्तीत जास्त प्रवासी मिळवण्यासाठी एसटी बसपेक्षा कमी पैशांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते.
या अवैध वाहतुकीसाठी केवळ पुण्यातीलच गाड्या वापरल्या जात नाहीत, तर एमएच १५ पासिंग असणारी नाशिकमधील वाहने वापरली जातात.
या अवैध वाहतुकीत कमिशनवर काम करणारी टोळी सक्रिय आहे. यातील लोक वाहनचालकांना प्रवासी मिळवून देतात. एका प्रवाशामागे ३० ते ५० रुपये या लोकांना मिळतात. त्यामुळे सकाळपासूनच हे लोक प्रवासी मिळवण्यासाठी बसथांब्यावर गर्दी करतात.
नाशिक महामार्गावर अनेक ठिकाणी रुंदीकरणाची कामे चालू आहेत. शिवाय, काही ठिकाणी एकपदरी रस्ता आहे. त्यामुळे विशिष्ट वेगमर्यादेतच वाहन चालविणे गरजेचे आहे. परंतु, ज्या गाड्यांमधून ही अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. त्या वाहनांच्या चालकांकडून कोणत्याही वेगमर्यादेचे पालन केले जात नाही. त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)