अवैध प्रवासी वाहतूक जोरात

By Admin | Published: May 19, 2016 02:25 AM2016-05-19T02:25:35+5:302016-05-19T02:25:35+5:30

शहरातील गवळीवाडा या मध्यवर्ती ठिकाणी एसटीचे मोठे स्थानक आहे.

Illegal travel traffic loud | अवैध प्रवासी वाहतूक जोरात

अवैध प्रवासी वाहतूक जोरात

googlenewsNext


लोणावळा : शहरातील गवळीवाडा या मध्यवर्ती ठिकाणी एसटीचे मोठे स्थानक आहे. पूर्वी राज्यभरातील एसटी बसेस या स्थानकावर थांबत होत्या. यामुळे स्थानकाचा परिसर सतत गजबजलेला असायचा. आता मात्र एसटी अधिकाऱ्यांनी वलवण येथे बेकायदेशीरपणे दोन खासगी हॉटेलांना एसटीचे थांबे मंजूर केल्याने लांब पल्ल्यांच्या बसेस, तसेच निमआराम बस या शहरातील बसस्थानकावर न येता गावाबाहेरील या थांब्यावर थांबत असल्याने बसस्थानकात अनेक वेळा बसच नसतात. यामुळे प्रवासी हैराण होत असून, बसेस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी बसेस अथवा प्रवासी कारमधून प्रवास करावा लागत आहे.
बसस्थानकात बसेस येत नसल्याने याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी घेतला आहे. पूर्वी स्थानकाच्या आवारात खासगी गाडी आणण्यासही बंदी असलेल्या ठिकाणी, तसेच कंट्रोल रूमच्या शेजारी सध्या गाड्या उभ्या करून प्रवासी खासगी वाहनांमधून पळविले जात असताना व्यवस्थापक व आगारप्रमुख बघ्याची भूमिका घेत आहेत.
स्थानकातील या अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात २०१४ साली उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली असतानाही स्थानक परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू आहे. याला एसटीचे अधिकारीच जबाबदार असल्याचे नागरिक सांगतात. (वार्ताहर)
>एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात नो पार्किंग झोन
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत गवळीवाडा येथे लोणावळा बसस्थानक असून, हा परिसर सतत गजबजलेला असतो. महामार्ग, बसस्थानक व रेल्वे स्थानक याच ठिकाणी असल्याने अनेक टूरिस्ट स्टँड, रिक्षा स्टँड या परिसरात आहे. बस स्थानकाच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ करून वाहनांवर कारवाई करावी, अशी तळेगाव आगारप्रमुखांची मागणी असून, त्याबाबतचे पत्र, तसेच बस स्थानकाच्या परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनांचे क्रमांक एसटीच्या आगारप्रमुखांनी शहर पोलिसांना दिले आहेत. स्थानकाच्या हद्दीतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांक आम्ही कारवाईसाठी अहवाल तयार करून रोज देत असल्याचे तळेगाव दाभाडे आगाराचे प्रमुख माने यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र या वाहनांच्या क्रमांकावर आक्षेप घेतला आहे. घरातील नागरिकांना सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांचे क्रमांकही एसटी विभागाकडून कारवाईसाठी देण्यात येत असल्याचे शहर पोलीस सांगतात.
एसटीच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या बाहेर खासगी हॉटेलांना थांबे दिल्यामुळे लोणावळ्यातील एसटी स्थानक तोट्यात चालले असून, याचे खापर अधिकारी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या माथी फोडत असल्याचा या भागातील व्यावसायिक व वाहनचालकांचा आरोप आहे.
खासगी वाहनचालक बस स्थानकाच्या आवारात येऊन अवैध प्रवासी वाहतूक करत असले, तर त्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार एसटीच्या अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, एसटीचे अधिकारी येथे कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही. उलटपक्षी ही कारवाई पोलिसांनी करावी, असे सांगत हात वर करतात. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांच्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाई न करणे, तसेच शहराबाहेर खासगी हॉटेलांना एसटीचा थांबा देणे, या भूमिकाच संशयास्पद आहेत.
>कारवाईत राजकारण्यांचा हस्तक्षेप
लोणावळ्यात निम्म्याहून अधिक प्रवासी वाहने खासगी असून, प्रवासी वाहतूक करण्याची त्यांना परवानगी नसतानाही अवैध वाहतूक सुरू आहे. या अवैध वाहनांच्या विरोधात महामार्ग व वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली की, काही राजकीय मंडळीच हस्तक्षेप करून कारवाई थांबवत असल्याचे आढळून येत आहे. राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप व खासगी वाहनचालकांसोबतचे आर्थिक हितसंबंध यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात लोणावळ्यात कारवाई होत नसल्याचे उघड सत्य आहे.

Web Title: Illegal travel traffic loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.