सांस्कृतिक एकजुटीचे मूर्तिमंत उदाहरण

By admin | Published: August 27, 2016 02:04 AM2016-08-27T02:04:48+5:302016-08-27T02:04:48+5:30

सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याख्या खऱ्या अर्थाने समजावून देणारे मंडळ म्हणून आग्रीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे.

An illustrative example of cultural unity | सांस्कृतिक एकजुटीचे मूर्तिमंत उदाहरण

सांस्कृतिक एकजुटीचे मूर्तिमंत उदाहरण

Next

चेतन ननावरे,

मुंबई- सार्वजनिक गणेशोत्सवाची व्याख्या खऱ्या अर्थाने समजावून देणारे मंडळ म्हणून आग्रीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ओळख आहे. गेल्या पाच वर्षांत मंडळावर आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अनेक संकटे आली. अगदी मंडळाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना, मंडळ आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने संकटाला टक्कर देत एकजुटीचे मूर्तिमंत उदाहरण सादर केले आहे.
१९४९ साली स्थापन केलेल्या मंडळाचे यंदा ६७वे वर्ष आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ साली ‘मुंबईचा राजा’ स्पर्धेत मंडळाला पारितोषिक मिळाले. मात्र पारितोषिकाचा आनंद साजरा करण्याआधीच गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणारी जागा हिरावली जाण्याचे संकटही मंडळावर आले. या संकटाला सामोरे जाण्याचा निर्णय मंडळातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने घेतला. या छोट्याशा मंडळासमोर पोलीस, पालिका आणि विकासकाचे कडवे आव्हान होते. मात्र एकत्रितपणे सतत चार वर्षे संघर्ष केल्यानंतर रस्त्यावर बसणाऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना त्याच
जागी असलेल्या सभागृहात करण्यात आली.
मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद शिर्के यांनी सांगितले की, मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळेच हे शक्य झाले. पालिका, पोलीस आणि विकासक यांनीही मंडळ आणि कार्यकर्त्यांची बाजू समजून घेत सहकार्य केले. गेल्या वर्षी डीजेला बगल देत भजनाच्या तालावर मंडळाने लाडक्या बाप्पाचे आगमन केले. तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विसर्जनालाही डीजेला विरोध करीत भजनाच्या तालावरच बाप्पाची मिरवणूक काढली.
यंदा बाप्पाच्या आगमन सोहळ्यात महिला लेजीम पथकाची सलामी हे विशेष आकर्षण असणार आहे.
>...त्यांचा वाटाही मोलाचा
हुशार विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते. मात्र विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा असतो तो म्हणजे पालकांचा. म्हणूनच मंडळातर्फे पालकांनाही गौरवले जाते.
आरोग्य शिबिर हवेच
दरवर्षी मंडळातर्फे भक्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. त्यात ब्लड प्रेशर, शुगर, बॉडी मास्क इंडेक्सची तपासणी केली जाते. ही तपासणी मोफत केली जाते. प्रत्येक भक्ताने निरोगी राहावे, यासाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा कार्यकर्त्यांचा हट्ट असतो.
>पारंपरिक स्पर्धांचे महत्त्व
मंडळाच्या कार्यक्रमांत महिलांचा सहभाग असावा, म्हणून पाककला स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वेळी विजेत्या महिलांना पैठणी, तर सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला साडी बक्षीस म्हणून दिली जाते. त्याचप्रकारे लहान मुलांना बौद्धिक खतपाणी देणाऱ्या पारंपरिक स्पर्धांना मंडळ महत्त्व देते. म्हणूनच चिमुरड्यांसाठी हस्तलेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण
आग्रीपाडा परिसरात हिंदू समाजासोबत मुस्लीम बांधवही मोठ्या संख्येने राहतात. गणपतीच्या जागेचा वाद निर्माण झाला होता, त्या वेळी येथील मुस्लीम बांधवही मदतीला धावून आले होते. १० दिवसांचा बाप्पा त्या वेळी मंडळाने सलग २१ दिवस विसर्जित केला नव्हता.
दरम्यान, मुस्लीम बांधवांना आरतीचा मान देत मंडळाने हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अनोखे उदाहरण सादर केले
होते.
स्पर्धा नको, एकता हवी
संकटकाळी धावून येणाऱ्या इतर गणेशोत्सव आणि सार्वजनिक मंडळांसोबत विभागातील महत्त्वाच्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित केले जाते. त्यामुळेच सामाजिक एकता आणि बंधुता टिकवता येते, असा मंडळाचा समज आहे. या उपक्रमामुळे मंडळांमध्ये स्पर्धेऐवजी एकता वाढते, असेही मंडळाचे म्हणणे आहे.

Web Title: An illustrative example of cultural unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.