पदाची अपेक्षा नाही, मी ‘किंगमेकर’ बनणार! पंकजा मुंडे यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:45 AM2018-10-19T05:45:39+5:302018-10-19T05:45:52+5:30
यंदाचा दसरा मेळावा भगवान गडाऐवजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झाला. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांशी थेट दोन हात करण्याची भाषा केली.
बीड : मला कुठल्याही पदाची आसक्ती नाही; परंतु, राजकारणात किंगमेकरची ताकद अंगी बाळगून आहे. बाबा हयात असताना त्यांना आणि त्यांच्या पश्चात मला अनेकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण मी वाघाच्या पोटी जन्मलेली वाघीण आहे. मी कुणाला घाबरत नाही. मी पुन्हा निवडून येणारच शिवाय पाच-पन्नास आमदारही निवडून आणणार, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय एल्गार पुकारला.
यंदाचा दसरा मेळावा भगवान गडाऐवजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे झाला. राष्ट्रसंत भगवानबाबांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी राजकीय विरोधकांशी थेट दोन हात करण्याची भाषा केली. पंकजा भाषणास उभ्या ठाकताच ‘महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, पंकजा मुंडे जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. काही वक्त्यांनीही त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला. हाच धागा पकडून पंकजा म्हणाल्या, मला कुठल्याही पदाची आसक्ती नाही; परंतु, राजकारणात किंगमेकर बनण्याची ताकद बाळगून आहे. उद्याचा दिवस मावळायच्या आत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळाची घोषणा होईल आणि महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी घोषणाही पंकजा यांनी केली.
धनंजय मुंडे यांना टोला
भगवानबाबांचे स्मारक होऊ नये म्हणून प्रयत्न झाला. उत्सव घेऊन मी लोकांची करमणूक करीत नाही, असा टोलाही पंकजा यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला. सर्व्हेचा हवाला देऊन प्रीतम मुंडेंचा मतदारसंघ धोक्यात असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. कागदावरचा सर्व्हे मी मानत नाही, असे सांगत त्यांनी गर्दीकडे बोट दाखवित, हा खरा सर्व्हे असे म्हटले.