"मी इतिहासाचा जाणकार नाही, पण...", वाघ नखांबद्दलच्या दाव्याबाबत शरद पवारांचा सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:59 PM2024-07-09T15:59:11+5:302024-07-09T16:06:33+5:30
Sharad Pawar : लंडनहून येणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ही लवकरच लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. परंतु, लंडनहून येणारी वाघनखे ही छत्रपती शिवरायांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या या दाव्याची लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडूनही पुष्टी करण्यात आल्याची माहितीही इंद्रजीत सावंत यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही इतिहासाचा जाणकार नाही, मात्र यातील जाणकारांचं मत सरकारने एकदम दुर्लक्षित करू नये, असे विधान शरद पवार यांनी केले आहे. ते म्हणाले, "इंद्रजीत सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे. इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास आहे योगदान आहे . मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये."
याचबरोबर, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावरही शरद पवार यांनीही भाष्य केलं आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही, मी त्याच्यात लक्षही देत नाही. पण, जयंत पाटील यांना ते लोकं भेटतात, याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचं मतदान झाल्यावर कळेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
इंद्रजीत सावंत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ते संग्रहालय स्वतः सांगत आहे की, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकारी करारासाठी गेले होते, तेव्हाही त्यांनाही हे स्पष्टपणे सांगण्यात आलं की, ही वाघनखं शिवरायांची नाहीत. तसेच, संग्रहालयाच्या संचालकांनी याबाबत करार करण्यासाठी महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितली आहे. तुम्ही ही वाघनखे भारतात घेऊन गेल्यानंतर ज्या संग्रहालयात वाघनखे ठेवणार आहे, तिथे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. याविषयी साशंकता असल्याचे स्पष्ट करावे, असे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने पत्रात लिहिले असल्याचे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.