Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 04:29 PM2021-10-29T16:29:32+5:302021-10-29T16:29:42+5:30
'भाजपचे लोक मला भंगारवाला म्हणतात, होय माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे.'
मुंबई: ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. नवाब मलिकसमीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणात अनेक भाजप नेत्यांनीही नवाब मलिक आणि सरकारवर टीका केलीये. या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी लोकमतशी सविस्तर चर्चा केली.
अधिवेशनात मोठा खुलासा करणार
यावेळी नवाब मलिक म्हणाले, भाजपचे अनेक नेते माझ्यावर टीका करत आहेत. पण, मी त्यांना आता काहीच उत्तर देणार नाही. माझ्याकडे अनेक नेत्यांच्या मोठ्या प्रकरणांची कागदपत्रे आहेत. येत्या अधिवेशनात या सर्व प्रकरणावर मोठा खुलासा करेल. मी कुणालाही घाबरत नाही. मी माझ्या बोलण्यावर ठाम. अधिवेशनात यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी जहरी टीका मलिकांनी यावेळी केली.
होय मी भंगारवाला आहे
मलिक पुढे म्हणाले की, भाजपचे लोक मला भंगारवाला म्हणतात. होय माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझं कुटुंब आजही भंगाराचा व्यवसाय करत आहे. तुम्ही आजही तिथे जाऊ शकता. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. पण, या लोकांना भंगारवाल्याची किमया अजून माहीत नाही. भंगारवाला निरुपयोगी गोष्टी जमा करतो. भंगाराचे तुकडे करतो आणि मग ते भट्टीत टाकून त्याचं पाणी पाणी करतो. या शहरात असलेल्या सगळ्या भंगारांचे तुकडे तुकडे करून भट्टीत टाकून त्यांचं पाणी पाणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं म्हणत मलिकांनी भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला.
बॉलिवूडला युपीत नेण्याचा डाव
नवाब मलिक यावेळी म्हणाले, मागील काही वर्षांपासून काही लोकांकडून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरुये. या बॉलिवूडमुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो, या इंडस्ट्रीचा देशाच्या जीडीपीमध्ये 2-3 टक्के वाटा आहे. पण, काहीजण बॉलिवूडला ड्रग्सचा अड्डा असल्याचं भासवत आहेत आणि या बॉलिवूडला इतर राज्यात पळवण्याचा प्रयत्न करताहेत. मागे एकदा भाजपच्या जवळच्या काही लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. योगींनी युपीवूड सुरू करण्याची घोषणा केलीये, त्यामुळे मुंबईतील इंडस्ट्री तिकडे हलवण्याचा डाव काहीजण आखत आहेत. पण, त्यांचा हा डाव कधीच पूर्ण होणार नाही.