राष्ट्रवादीनं देऊ केलेल्या लोकसभेच्या तिकीटावर उज्ज्वल निकम म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 11:04 PM2019-01-06T23:04:07+5:302019-01-06T23:07:55+5:30
उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणूक लढविण्यास तूर्त नकार
जळगाव- विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीचं तिकीट देऊ केल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. यावर निकम यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. तूर्तास माझा राजकारणाचा प्रवेश करण्याचा मानस नाही. सध्या माझ्याकडे अनेक खटल्यांची कामं आहेत, असं निकम म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने निकम यांना जळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर निकम आज पत्रकार दिनासाठी आले असताना राष्ट्रवादीचे नेते अरुण भाई गुजराथी यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र निकम यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. 'अरुण गुजराथी यांनी व्यक्त केलेल्या सद्भभावनेबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मात्र राजकारण हा माझा सध्याचा पिंड नाही. याबद्दल मी अद्याप गांभीर्यानं विचार केलेला नाही. कारण सध्या अनेक खटल्यांच्या कामात मी व्यस्त आहे. पुढे मी याबद्दल विचार करु शकतो. मात्र आज तरी मी याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही,' असं निकम म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकम यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढण्याचा आग्रह केला. 'राजकारणात चांगली माणसं येणं गरजेचं आहे. जळगावला तुमच्यासारखा अभ्यासू आणि उच्चशिक्षित खासदार मिळेल. त्यामुळे तुम्ही आमच्या आग्रहाचा विचार करा,' असं आवाहन गुजराथी यांनी केलं.