मी साधुसंन्याशी नाही!
By Admin | Published: August 6, 2016 03:04 AM2016-08-06T03:04:27+5:302016-08-06T03:04:27+5:30
पटवारी यांची उमेदवारी राम कापसे यांनी नव्हे, तर पक्षाने कापली होती
डोंबिवली : विधानसभेकरिता माझी उमेदवारी निश्चित होण्याच्या वेळी प्रदेश कार्यालयात मला तत्कालीन प्रदेश उपाध्यक्षा मंगला कुलकर्णी भेटल्या व त्यांनी मला सूचना केली की, ‘तू तरुण आहेस. आबासाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. तेव्हा त्यांना उमेदवारी दिली तरी चालेल, असे तू सांग.’ त्यावर मी त्यांना म्हटले की, ‘मी काही साधुसंन्याशी नाही. पक्षाने मला उमेदवारी दिली, तर मी नक्की निवडणूक लढवेन आणि पक्षाने पटवारी यांना दिली, तर त्यांच्यासाठी काम करेन.’ त्यानंतर, पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली. त्यामुळे पटवारी यांची उमेदवारी राम कापसे यांनी नव्हे, तर पक्षाने कापली होती. साहजिकच, पटवारी यांचे दावे खोटे आहेत, असेही पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, त्या निवडणुकीत पटवारी यांनी मला निवडून आणण्यासाठी मनापासून काम केले. त्या एकाच निवडणुकीत नाही, तर पुढील तिन्ही निवडणुकांत त्यांनी माझ्यासाठी काम केले. त्यामुळे आता इतक्या वर्षांनी पटवारी कापसेंविषयी असे का बोलले, ते अनाकलनीय आहे. मी नऊ वेळा निवडणुका लढवल्या. त्यापैकी दोन वेळा विधानसभा आणि एका वेळी खासदारकीची निवडणूक जिंकलो. मला पक्षाने जास्त दिले! ते का दिले? सारखा माझाच का विचार झाला? तर तो पक्षाचा निर्णय होता. एखाद्या व्यक्तीचा नव्हता, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
पटवारी यांच्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या आत्मचरित्रात त्यांनी उमेदवारीबाबत व्यक्त केलेली खंत आणि त्यावर पक्षातून उमटलेल्या प्रतिक्रियांबाबत ते ‘लोकमत’शी बोलत होते.
पटवारी हे ज्येष्ठ नेते आहेत. उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय हा केवळ दिवंगत नेते राम कापसे यांचा नव्हता, तर पक्षाने घेतला होता. पक्षातर्फे ज्येष्ठ नेते वसंतराव भागवत, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी हा निर्णय घेतला होता, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
>उमेदवारी कापसेंनी नव्हे, तर पक्षाने कापली
१९८२ साली ठाण्याचे खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात खासदारकीच्या पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची, यासाठी वसंतराव भागवत यांच्या उपस्थितीत कल्याणला भगवानराव जोशी यांच्या घरी बैठक पार पडली.
बैठकीत उमेदवारी कोणाला द्यायची, यावर बराच खल झाला. मात्र, निर्णय काहीच होत नव्हता.
त्या वेळी जोशी यांनी भागवतांना सुचवले की, साडेचार वर्षे जगन्नाथ पाटील हे म्हाळगी यांच्यासोबत फिरले आहेत.
त्यांना मतदारसंघाची जाण आहे. त्यांनाच उमेदवारी द्यावी. पक्षाने मला उमेदवारी दिली. मी निवडूनही आलो.
>१९९०पर्यंत शिवसेना-भाजपाची युती घट्ट झाली. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ हा भाजपाकडे होता. मात्र, ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी मला मुंबईत बोलावून घेतले आणि युतीच्या जागावाटपात अंबरनाथ मतदारसंघाबाबत शिवसेना आग्रही आहे, असे सांगितले. त्या जागेवरून शिवसेनेचे साबीर शेख निवडणूक लढवणार आहेत, असे त्यांनी सांगताच एका मिनिटाचाही विचार न करता मी त्यांना ‘ही जागा सोडून द्या, मला चालेल,’ असे उत्तर दिले.
प्रमोदजींना भेटून आल्यावर मला गोपीनाथ मुंडे यांचा फोन आला. त्यांनीही मुंबईत भेटायला बोलावले. अंबरनाथची जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेला दिल्याचा पुनरुच्चार केला. त्यावर मला या निर्णयाची कल्पना असल्याचे मी मुंडेंना सांगितले.
तेव्हा मुंडे मला म्हणाले की, तू कशाला काळजी करतोस? तोवर, मी कल्याणमधून निवडणूक लढवणार, हे निश्चित झाले होते. ते पक्षाच्या या नेतेमंडळींनी निश्चित केले होते. या निर्णयप्रक्रियेत महाजन, मुंडे आणि भागवत होते. त्याच्याशी कापसे यांचा काहीएक संबंध नव्हता, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
>त्या काळातील घटनाक्रम सांगताना पाटील म्हणाले की, १९७८ साली जनता पार्टीतर्फे विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी तत्कालीन पक्षश्रेष्ठी वसंतराव भागवत यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीत पक्षानेठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि वाडा या जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यातील, अंबरनाथ विधानसभेची
जागा मला मिळाली. मला उमेदवारी देण्याचा निर्णय
हा पक्षाचा होता. तेथे मी निवडून आलो. नंतरच्या काळात पक्ष अडचणीत सापडला. सरकार गेले.