'मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या ऐकून मला विट आलाय'; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:18 PM2023-06-05T19:18:21+5:302023-06-05T19:21:16+5:30
आगामी २० तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ठीक नाहीतर २०२४ नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत आगामी निवडणुका भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे लढवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. तर, मंत्रिमंडळ विस्तावरही चर्चा झाल्याची सांगण्यात येत आहे. याचदरम्यान शिंदे-फडणवीस सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी २० तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ठीक नाहीतर २०२४ नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा खरच होणार की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या ऐकून आता विट आल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. युतीतील अनेक आमदारांना अद्याप कोणतीच खाती न मिळाल्याने नेते नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. तर, येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार होणार
मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे, पण केव्हा होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, तेच तुम्हाला सांगतील. आम्ही सगळ्या निवडणुका एकत्रित लढणार आहोत, त्याची रणनिती आखायची आणि जिल्हा व तालुका पातळीवर समन्वय घडवायचा, याचीही चर्चा आमची दिल्लीतील बैठकीत झाली. त्यामुळे, आगामी सर्वच निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.