बेस्ट वसाहतीवर चढणार इमले!
By admin | Published: September 15, 2014 04:22 AM2014-09-15T04:22:55+5:302014-09-15T04:22:55+5:30
गोरेगाव आणि घाटकोपर येथील बेस्ट उपक्रमांच्या जागेवरील नागरी वसाहतींच्या बेस्ट कामगारांच्या १३०० कुटुंबीयांचा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला
मुंबई : गोरेगाव आणि घाटकोपर येथील बेस्ट उपक्रमांच्या जागेवरील नागरी वसाहतींच्या बेस्ट कामगारांच्या १३०० कुटुंबीयांचा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे भविष्यात बेस्ट वसाहतींवर इमले चढणार आहेत. महापालिकेच्या मुंबई शहर आणि उपनगरात अनेक जमिनी असून, त्यावर कर्मचाऱ्यांकरिता गेल्या ३०-४० वर्षांपासून निवासी संकुले बांधली गेली आहेत.
गोरेगाव (प.) येथील बेस्ट वसाहतीमधील सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्था २०-२५ वर्षे
जुनी आहे. या संस्थेच्या पुनर्विकासाबाबत विचार सुरू होता. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने गेल्या वर्षापासून बेस्ट प्रशासनाशी पुनर्विकासाबाबत पाठपुरवठा केला होता. बेस्ट प्रशासनाचे महाव्यवस्थापक आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात ३-४ बैठकादेखील झाल्या. त्यामुळे गोरेगाव आणि घाटकोपर येथील
१३०० कुटुंबीयांच्या निवासांचा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची प्रतिक्रिया समिती सदस्य विनोद गोवेकर आणि शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख चंद्रकांत मोरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)