पुणे मेट्रोला तात्काळ मान्यता देऊ- मुख्यमंत्री
By admin | Published: May 13, 2016 05:36 PM2016-05-13T17:36:33+5:302016-05-13T17:36:33+5:30
पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डकडून मंजुरी मिळताच राज्य शासन तत्काळ मान्यता देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13- पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डकडून मंजुरी मिळताच राज्य शासन तत्काळ मान्यता देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महानगरपालिकेशी निगडीत असणाऱ्या प्रलंबित प्रश्नांबाबत येथील विधान भवन येथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मेट्रो प्रकल्पाची सद्यस्थिती आणि करावयाची कार्यवाही याबाबत माहिती दिली. त्यावर केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. सध्या हा प्रकल्प पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डसमोर जाण्याची अपेक्षा आहे. या बोर्डाची मंजूरी मिळताच केंद्र आणि राज्य शासनाकडून तत्काळ मान्यता देण्यात येईल. यासाठी पुणे महानगर मेट्रो रेल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करण्यात येईल.याबाबत दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे नायडू यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी सांगितले.
पुणे शहरासाठी चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी 2000 कोटींचे कर्ज उभारण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तत्काळ महानगरपालिकेने पाठवावा. तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करू द्यावे. प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण कामासाठीचा आवश्यक तो निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एचसीएमटीआर प्रकल्पासाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा घेता येईल का याबाबत विचार केला जावा, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील नदी सुधारणेच्या बाबतीत स्पेशल पर्पज व्हेईकलची स्थापना करावी, जेणेकरून संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधून काम वेळेत करता येणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पीएमपीएमएलच्या सुधारणेसाठी त्याचा बिझनेस प्लॅन तयार करावा, त्याचबरोबर येत्या पंचवीस वर्षाचा ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार केला जावा, अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीमती अनु आगा, आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, अनिल भोसले, जगदीश मुळीक, विजय काळे, सुरेश गोरे, जयदेव गायकवाड, माधुरी मिलाळ, मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, दीप्ती चवधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.