अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:29 AM2018-08-22T02:29:59+5:302018-08-22T06:49:15+5:30
वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले आहे.
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशीष शेलार हे बुधवारी दिल्लीहून मुंबईत आणणार आहेत. राज्यातील विविध नद्यांमध्ये या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले आहे.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, श्रद्धांजली सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर भावना व्यक्त करतील. जिल्ह्यांच्या ठिकाणीही श्रद्धांजली सभा होतील. अटलजींच्या अस्थींचे विसर्जन मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये करण्यात येईल. मुंबईत श्रद्धांजली सभास्थानी अस्थी कलश हस्तांतरित केले जाईल.
१० लाखांची पाठ्यवृत्ती
अटलजींचे साहित्य व विचार याविषयी पीएच. डी.साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल.
सर्व विद्यापीठांत अटल अध्यासन
राज्यातील सर्व १३ विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यात येईल व त्यासाठी राज्य सरकार २० कोटी रुपयांची तरतूद करेल, अशा घोषणा मुनगंटीवार यांनी केली.