मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम

By admin | Published: July 14, 2017 11:35 AM2017-07-14T11:35:45+5:302017-07-14T11:35:45+5:30

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा येथे हॉटेल कैलास पर्बत समोर एक मोठं झाड कोसळले आहे.

The impact of the collapse of a tree collapsed on the Mumbai-Pune national highway | मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम

Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 14 - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळा येथे हॉटेल कैलास पर्बत समोर एक मोठं झाड कोसळल्याची घटना घडली आहे. पावसामुळे हे झाड कोसळले आहे.  यामुळे मुंबईकडे जाणा-या वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. कोसळलेले झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येथील वाहतूक एकेरी मार्गानं सुरू आहे.   
 
लोणावळा परिसरात गुरुवारी (13 जुलै ) दुपारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पाऊस व जोरदार वा-यामुळेच हे झाड कोसळून रस्त्यावर पडले आहे. 
 
दरम्यान, लोणावळ्यामध्ये गेल्या 18 तासांत तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली असून येथील नदीनाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. जून महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर मागील आठवड्या भरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाले आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून लोणावळ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली  ती संततधार अद्यापही कायम आहे. 
 
(VIDEO : नाशिकमध्ये संततधार, गोदावरी नदीला आला पूर)
( विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी)
 
 
गुरुवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यत 213 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही रस्ते जलमय झाले आहेत. डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून धरणांने 50 टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे.
 
तर दुसरीकडे,  नाशिक शहर परिसरात गुरुवारी ( 13 जुलै ) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा पडला असून परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत.
दशक्रिया विधिसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाल्याने परिसरातील धर्मशाळेतच सध्या धार्मिक विधि सुरू आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.  
 
तर,   प्रदीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी (13 जुलै ) मुंबई, ठाणे परिसरासह राज्यात पावसाचे पुनरागमन झाले. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासह सर्व जण या आनंदधारांंनी चिंब झाले. चातकासारखी वाट पाहायला लावून का असेना... आला एकदाचा बाबा, असे आनंदी भाव सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, असाच कायम राहिल्यास दुबार पेरण्यांचे संकट दूर होणार आहे.
 
उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. त्याचवेळी पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरातसह महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दिवसभरात कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी दमदार सरी बरसल्या. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. पश्चिम वऱ्हाडात बुधवारपासून तुरळक पावसाला सुरुवात झाली असून, अकोला, वाशिम बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.
 
वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ ए़ के. श्रीवास्तव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, महाराष्ट्राच्या दृष्टीने सध्या अनुकूल स्थिती आहे़ पुढील २ ते ३ दिवस विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे़ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, त्यावर आमचे लक्ष आहे़ १६ जुलैनंतर ते सक्रिय होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे मराठवाड्यासह सर्वत्र चांगला पाऊस होऊ शकतो.
 

Web Title: The impact of the collapse of a tree collapsed on the Mumbai-Pune national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.