वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका; धान्य, कांद्याची आवक घटली, मालवाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 06:49 AM2024-01-02T06:49:31+5:302024-01-02T06:50:24+5:30

कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

Impact of transporters' agitation; Inflow of grain, onion decreased, cargo transportation stopped | वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका; धान्य, कांद्याची आवक घटली, मालवाहतूक ठप्प

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका; धान्य, कांद्याची आवक घटली, मालवाहतूक ठप्प


नवी मुंबई : वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली. धान्य वाहतुकीलाही फटका बसला. 

कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

मालवाहतूक ठप्प
उरण : वाहनचालकांनी जेएनपीए परिसरातील कंटेनर वाहतूक रोखली. नंतर वाहने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता खुला केल्याची माहिती न्हावा - शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिली.  पण, चालकांनीच वाहने चालविण्यास नकार दिला. यामुळे पाचही बंदरातील कंटेनरची वाहतूक ठप्प झाली. आठ हजार कंटेनर ट्रेलर्सवर चालक नसल्याने वाहने उभी करून ठेवल्याची माहिती न्हावा -शेवा कंटेनर ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली. बंदरातून दररोज सुमारे २५ हजार कंटेनरची वाहतूक होते. बंदमुळे त्यांची चाके थांबल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेइकल ॲण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली. 

विरोध नेमका कशामुळे ? -
जुना कायदा काय म्हणतो?
हिट अँड रन घटनांशी संबंधित विद्यमान कायद्याचा भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०४ अ अंतर्गत जो कोणी अविचारी किंवा निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल त्याला दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातील.

नवीन कायद्यात काय तरतूद?
- १०४ (१) : निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे सदोष मनुष्यवध नाही. दोषीला ५ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड.
- १०४ (२) : घटनास्थळावरून पळून गेला किंवा घटनेनंतर लगेच पोलिस अधिकारी किंवा दंडाधिकारी यांना घटनेची माहिती दिली नसेल तर १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड.

टॅंकरच्या बंदमुळे इंधन तुटवडा होणार? 
मनमाड (जि. नाशिक) :  संपात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, इंडेन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले. त्यामुळे राज्यात इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. संप कायम राहिल्यास पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. 
गोंदिया : वाहनचालकांनी टायर जाळून संताप व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आंदोलनात ट्रक, काळी-पिवळी, ऑटो व टँकरचालक सहभागी झाले. 
 

Web Title: Impact of transporters' agitation; Inflow of grain, onion decreased, cargo transportation stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.