राज्यात मातृत्व अनुदान योजना राबविणार
By Admin | Published: June 13, 2017 01:21 AM2017-06-13T01:21:46+5:302017-06-13T01:21:46+5:30
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात
- विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात ग्रामविकास आणि महिला व बालविकास विभागाच्या वित्त व नियोजन विभागाकडे असलेल्या प्रलंबित विषयांवर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, मातृत्व अनुदान योजनेत ज्या गर्भवती महिला कोणत्याही कारणांमुळे आपली प्रसुतीपूर्व तपासणी करू शकलेल्या नाहीत. त्यांना अशा प्रकारच्या तपासण्या करण्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देणे, कुपोषणग्रस्त महिलांच्या बाबतीत त्यांच्या आजारांचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने योग्य व उचित व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देणे, किशोरवयीन व लवकर गर्भधारणा होणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांना विशेष देखभालीची आवश्यकता असल्याने त्यांच्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणे, गर्भधारणेच्या कालावधीत उद्भवणारा रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा आदी आजारांचे नियमित चाचण्या व तपासण्या करून उचित व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
अंगणवाडी सेविकांचे मानधन
जुलैपासून बँक खात्यात
अंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेत व नियमित मिळण्यासाठी तसेच बँक खात्यात थेट जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ जुलैपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट बँकेत जमा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
सोमवारी झालेल्या बैठकीत वित्त व नियोजन विभागाकडे प्रलंबित असलेल्या माझी कन्या भाग्यश्री, स्मार्ट अंगणवाडी, सुधारित मनोर्धैर्य योजना आदी योजना तसेच ग्राम विकास विभागाच्या विविध योजना तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.