गुजरातच्या भाजीबरोबर गुटख्याची आयात

By admin | Published: October 19, 2016 02:40 AM2016-10-19T02:40:16+5:302016-10-19T02:40:16+5:30

शासनाने गुटखाबंदी केली असली तरी राज्यात सर्वत्र बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू आहे.

Import of Gutkha with vegetables in Gujarat | गुजरातच्या भाजीबरोबर गुटख्याची आयात

गुजरातच्या भाजीबरोबर गुटख्याची आयात

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- शासनाने गुटखाबंदी केली असली तरी राज्यात सर्वत्र बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू आहे. गुजरातवरून भाजीच्या ट्रकमधून गुटखा मुंबई व नवी मुंबई बाजार समिती परिसरात आणला जात असून येथून तो शहरातील इतर दुकानदारांना पुरविला जात आहे. गांजामाफिया टारझन व त्याचा मुलगा तुरुंगात गेल्यानंतरही एपीएमसीमधील त्यांचा गांजा अड्डा पुन्हा सुरू झाला असून पूर्वीपेक्षा दुप्पट दराने विक्री केली जात आहे.
‘लोकमत’ने अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केल्यानंतर नवी मुंबईमधील गांजा, एमडी पावडर व इतर अमली पदार्थ विक्रेत्यांची धरपकड सुरू झाली आहे. आतापर्यंत २५ पेक्षा जास्त माफियांना अटक झाली आहे. पण अद्याप मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नाही. एपीएमसीमध्ये अड्डा चालविणारा टारझन व त्याचा मुलगा दत्ता विधातेला अटक केल्यानंतरही काही दिवस बंद असलेला त्यांचा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. भाजी मार्केटच्या बाहेरील शौचालयाजवळ खुलेआम गांजा विक्री सुरू झाली आहे. पूर्वी ६० ते ८० रुपयांना विकली जाणारी पुडी आता १६० रुपयांना विकली जात आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी छोटे विक्रेते आहेत. मुख्य वितरक अद्याप फरार आहेत. अटक झालेल्या आरोपींच्या जागेवर नवीन व्यक्तींची नेमणूक करून गांजा विक्री करून घेतली जात आहे. या व्यवसायामध्ये अंडरवर्ल्डचा सहभाग असून मोठ्या गुन्हेगारांचा व माफियांचा सहभाग आहे. जोपर्यंत मोक्कासारखी कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत पूर्णपणे अमली पदार्थांची विक्री थांबणार नसल्याचे बोलले जात आहे.
गांजाबरोबर गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाने गुटखाबंदी केली असल्यामुळे गुजरातवरून रोज लाखो रुपयांचा गुटखा मुंबई व नवी मुुंबईत आणला जात आहे. मुंबईत येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांमध्ये गुटख्याचा गोणी लपवून आणल्या जात आहेत. मुंबईमध्ये एपीएमसी परिसर व इतर ठिकाणी या गोणी उतरवून त्या स्थानिक दलालांच्या मार्फत पानटपऱ्यांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. यामध्ये मोठी साखळी कार्यरत आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीप्रमाणे रोज १० ते १५ लाख रुपयांचा गुटखा मुंबईत वितरित केला जात आहे. गुटख्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. नवी मुंबईमध्ये या विभागाचे कार्यालयच नसल्याने येथे गुटखा आणला जातो. कारवाईचे अधिकार नसल्याचे कारण देवून पोलीस जबाबदारी झटकत आहेत. कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे बिनधास्तपणे गुजरातचा गुटखा महाराष्ट्रातील तरुणाईचा व कष्टकरी कामगारांचे आरोग्य बिघडवत असून याविषयी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
>ंगुजरातसह उत्तरप्रदेशमधून येतो गुटखा
मुंबई व नवी मुंबईमध्ये गुजरातमधून विमल पान मसाला व गुटखा विक्रीसाठी येत आहे. चार रुपये किमतीचा हा पानमसाला व एक रुपयाची गुटखा पावडर दुप्पट दराने विक्री केली जात आहे. उत्तरप्रदेशच्या गाझीयाबादमधून राजश्री गुटखा विक्रीसाठी येत आहे. याशिवाय आरएमडी व इतर गुटख्याचीही खुलेआम विक्री होत आहे. पोलीस स्टेशन, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही अभय मिळत असल्याने हे अवैध व्यवसाय तेजीत आहेत. गुजरात व उत्तरप्रदेशचा गुटखा महाराष्ट्रातील तरुण व कामगारांचे आरोग्य बिघडवत असल्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
>दुप्पट ते पाचपट
दराने विक्री
बंदी असल्यामुळे चार व पाच रुपयांचा गुटखा दहा रुपयांना विकला जात आहे. आरएमडी गुटखा चक्क ५० रुपयांना विकला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक टपरीवर गुटखा विकला जात आहे. भाजी मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये अनधिकृत टपरीवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. या पानटपऱ्यांचे हप्ते सुरू असल्याचे बोलले जात आहे. हे हप्ते नक्की कोण घेत आहे याचाही शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
>गांजा विक्रेत्यांवर मोक्का लावावा
पोलिसांचा ससेमिरा चुकवून गांजा विक्री सुरूच आहे. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले आरोपी हे फक्त विक्रेते आहेत. खरे माफिया व पुरवठादार फरार आहेत. अटक झालेल्या आरोपींच्या जागेवर नवीन दलालांची नेमणूक करून गांजा विक्री करून घेतली जात आहे. मुख्य सूत्रधारांचा शोध घेवून त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली तर या व्यवसायाला आळा बसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

Web Title: Import of Gutkha with vegetables in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.