Bio Diversity Day : पक्षी जगवा, पृथ्वी जगेल... जाणून घ्या जैवविविधतेत पक्ष्यांचे महत्त्व किती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:27 AM2018-05-22T07:27:26+5:302018-05-22T11:57:25+5:30
जैवविविधतेच्या सगळ्या मोठ्या परिसंस्था अबाधित ठेवण्यात पक्ष्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
पक्षी जैवविविधतेतील सर्वात वरच्या क्रमांकाचा महत्त्वाचा घटक आहे. अन्नसाखळीत सर्वात वरचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगभरात पक्ष्यांच्या ५००० प्रकारच्या प्रजाती, तर भारतात १५०० प्रजाती आहेत. पक्ष्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांची योग्य संख्या यावर निसर्गाचा समतोल अवलंबून असतो.
जैवविविधतेच्या सगळ्या मोठ्या परिसंस्था अबाधित ठेवण्यात पक्ष्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जमिनीवर आढळणारे पक्षी, झाडांवर राहणारे पक्षी, तसेच पाण्यावर राहणारे पक्षी हे संपूर्ण पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि जैवविविधता संपन्न ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
सुतार, धनेश, तांबट पक्षी हे विविध वृक्षांची फळे खाऊन त्यांच्या विष्ठेद्वारे सुलभ बीजावरण करतात आणि वनस्पती उगवण्यास, वने वाढण्यास हातभार लावतात. एका फुलांवरून दुसऱ्या फुलांवर मध प्राशन करीत उडणारे छोटे पक्षी जसे सूर्यपक्षी, शिंजिर, फुलटे चष्मेवाला हे परागीभवनाचे काम करतात आणि फुलांना विविध रंग बहाल करतात. याचबरोबर विविध फुलांमधले, पानांवरचे कीटक खाऊन वनस्पतींचे आयुष्य वाढवतात. सुतारपक्ष्यांच्या प्रजाती झाडांना लागलेली वाळवी, सालाखालची कीड खातात आणि वृक्षांचे आयुष्य वाढवतात. अनेक पक्षी शेतपिकावरचे कीटक, कीड खातात.
विविध प्रकारचे पाणपक्षी जसे धीवर, खंड्या, करकोचे, शराटी, तसेच पाणथळीत चरणारे इतर पक्षी, मासे, खेकडे, झिंगे शिदोड इतर पाणकीटक खाऊन पाण्यातील जैविक साखळी नियोजित ठेवतात. हेच पक्षी जेव्हा रात्री निवाºयासाठी झाडांवर बसतात तेव्हा विष्ठेद्वारे कॅल्शियम कार्बोनेट हे नैसर्गिक खत जमिनीला-पिकांना बहाल करतात. समुद्री, तसेच पाणपक्षी यांची अबाधित संख्या यावर समुद्री जीवन अवलंबून असते.
गिधाड, कावळे, घारी यांना सफाई कामगार म्हटले जाते. हे पक्षी मरून पडलेल्या प्राण्याचे मांस, त्वचा, आतडे असे सर्व अवयव खाऊन परिसर स्वच्छ ठेवतात. घुबड आणि गरुडाच्या काही प्रजाती हे उंदीर मारून खातात. उंदीर शेतकºयांच्या धान्याचे ३० टक्के नुकसान दरवर्षी करीत असतात. भिंगरी, पाकोळी, पाणभिंगरी हे पक्षी हवेतल्या हवेत छोटे कीटक, चिल्टे, डास यांना फस्त करतात. नाली-डबकी येथे दिसून येणारे वंचक, पाणलावे यासारखे पक्षी घातक कीटकांची संख्या पाण्यात वाढू देत नाहीत.
विविध प्रकारची बदके जलाशयातील विविध वनस्पती, शेवाळ भक्षण करून पाणी स्वच्छ ठेवतात. साळुंकी, मैना, बगळे, होले हे कचराकुं ड्यांवर नेहमी चरताना दिसतात. शिळे अन्न, अन्नावरचे कीटक, जीवजंतू खाऊन आपल्याला मदत करतात. सोनारपक्षी, शराटी, धाणिक, टिटव्या शेतजमिनीतले कीटक, अळ्या खाऊन मदत क रतात. चिमण्या, भोरड्या मैना, मोर, तसेच इतर पक्षी पिकांवर पडणारी कीड, टोळ, नाकतोडे खाऊन पिकांचे रक्षण करतात. पाणपक्षी जेव्हा-जेव्हा पाण्यामध्ये डुबकी मारतात त्या-त्या वेळी ते पाण्यात प्राणवायू (आॅक्सिजन) सोडतात.
गायबगळी व इतर तत्सम पक्षी पाळीव प्राण्यांसोबत चरतात. हे पक्षी गायी, म्हशी, मेंढ्या यांच्या त्वचेवर आढणारे कीटक, गोचीड खातात.
सध्या शहरात पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याने कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. डास आणि उंदीर यांच्यावर खात्रीशीर असा कुठलाही उपचार मनुष्याला अजून सापडलेला नाही. कुठल्याही विषारी औषधाचा योग्य परिणाम अद्याप डास आणि उंदीर यांच्यापासून मानवाला मुक्ती देऊ शकलेला नाही. डास आणि उंदीर यांच्यावर नैसर्गिकदृष्या अंकुश फक्त पक्षीच ठेवू शकतात. सध्या महाराष्ट्रात कपाशीवर होणारा बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे तो फक्त कीटक आणि अळ्या खाणाºया पक्ष्यांचे प्रमाण खूप घटल्याचा परिणाम आहे.
मानवी हव्यास कारणीभूत
थोडक्यात पाण्यातली असो किंवा जमिनीवरची कीटकांची संख्या ही फक्त पक्ष्यांमुळे नियंत्रित राहिलेली आहे. पृथ्वीवरची जंगले ही पक्ष्यांद्वारे पसरलेली आहेत. जंगलातील वनस्पतींची-वृक्षांची-झुडपांची विविधता ही विविध पक्ष्यांच्या बीजारोपनामुळे शक्य झालेली आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाढत्या वसाहती, महामार्ग, मानवी अतिक्रमण या हव्यासापोटी वृक्षतोडी आणि अधिवास नष्ट होत चालला आहे.
डॉ. किशोर पाठक,
पक्षीमित्र, औरंगाबाद