भारतीय चार्टर्ड अकौंटंटना महत्त्व वाढले-थेट संवाद

By Admin | Published: October 23, 2014 10:20 PM2014-10-23T22:20:47+5:302014-10-23T22:54:30+5:30

कमी खर्चात होणारा कोर्स : सतीश डकरे

The importance of Indian chartered accountants increased- Direct Dialogue | भारतीय चार्टर्ड अकौंटंटना महत्त्व वाढले-थेट संवाद

भारतीय चार्टर्ड अकौंटंटना महत्त्व वाढले-थेट संवाद

googlenewsNext

जगातील आयटी, मोटार उद्योग, कापड, वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्या, कृषी अवजारे, धातू... अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये मंदीची झळ लागू शकते. मात्र, विविध उद्योगधंद्यांचे लेखापरीक्षण करणाऱ्या (सीए) सनदी लेखापालांना मंदीची झळ कधीच लागू शकत नाही; कारण हे क्षेत्रच आर्थिक लेखाजोखा यावरच आधारित आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर मंदी कधी येत नाही. सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांत प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासह विद्यावेतन आणि अत्यंत गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मोफत कोर्सही करता येतो. अशा या क्षेत्रात अधिकाधिक विद्यार्थी वळावेत. इतर कोर्सपेक्षा कमी खर्चातील कोर्स म्हणून द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौटंट्स आॅफ इंडियाच्या ‘चार्टर्ड अकौटंट’ या कोर्सकडे येण्याची संधी कोल्हापुरातही उपलब्ध झाली आहे. याबाबत कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सी.ए. सतीश डकरे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद..

प्रश्न : या कोर्सकडे येण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करावे लागेल?
उत्तर : सी.ए. अर्थात सनदी लेखापाल होण्यासाठी विद्यार्थ्यांना अकरावीपासून वाणिज्य शाखेमध्ये शिक्षण घ्यावे लागेल. बारावी झाल्यानंतर कॉमन प्रोफेशनल टेस्ट (सीपीटी) ही परीक्षा द्यावी लागेल. ती उत्तीर्ण झाल्यानंतर ‘इंटरमीजिएट प्रोफेशनल करिअर’ हा कोर्स पूर्ण करावा लागेल. त्यानंतर अंतिम परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी ज्येष्ठ सीएंकडे काम करावे लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यावेतनही इन्स्टिट्यूटतर्फे दिले जाते. तसेच
बी.एस्सी. ६० टक्के किंवा वाणिज्य शाखेचे ५५ टक्के गुण मिळवून थेट इंटरमीजिएट या परीक्षेकरिता बसता येते. तीन वर्षांचा एकूण ४९ हजार ३५० इतका खर्च या परीक्षेसाठी येतो. त्याचबरोबर संगणक, सुसज्ज लॅब, ग्रंथालय, अशा तीनमजली इमारतीमधील सुविधाही कोल्हापुरात उपलब्ध आहेत. या परीक्षेसाठी कितीही वेळा बसता येते हे वैशिष्ट्य आहे.
प्रश्न : या क्षेत्राकडे सध्या विद्यार्थ्यांचा कल आहे का?
उत्तर : सध्या कोल्हापुरात तीन हजार विद्यार्थी या परीक्षा देत आहेत. यामध्ये कोकण, इचलकरंजी, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी येथे शिकत आहेत. आजपर्यंत पुणे येथे मुलांना जावे लागत होते; मात्र नुकतीच इन्स्टिट्यूटची सुसज्ज अशी वास्तू झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या सुविधा मुलांना उपलब्ध झाल्या आहेत. कोल्हापुरात ६०० हून अधिक सी.ए. (सनदी लेखापाल) काम करीत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोगही विविध कार्यशाळांमार्फत या तीन हजार विद्यार्थ्यांना होत आहे.
प्रश्न : या क्षेत्रात पारंपरिक पद्धतीने काम सुरू आहे की, समानता आली आहे?
उत्तर : जगामध्ये एकाच प्रकारचा (बॅलन्सशिट) अहवाल २०१६ पासून बनविण्यात येणार आहे. यामध्ये आपले भारतीय सी.ए.ही मागे राहू नयेत म्हणून इंटरनॅशनल अकौंटिंग स्टँडर्ड बोर्ड (लंडन) या शिखर संस्थेच्या निर्देशानुसार अमेरिका, आॅस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड, आदी देशांतील सीए अभ्यासक्रमांसारखा आपलाही अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या पुस्तकीज्ञानाऐवजी संगणकीय व प्रत्यक्ष सरावाला महत्त्व प्राप्त झाले आहे; कारण भारतातील टाटा मोटर्ससारख्या कंपनीचे उदाहरण घेतले तर उत्तम ठरेल. टाटा मोटर्सने जग्वार ही परदेशी कंपनी विकत घेतली. मग त्या देशातील आयकर किंवा सरकारच्या कंपनी लॉ विभागाला वार्षिक ताळेबंद भारतातील पद्धतीप्रमाणे सादर करून चालणार नाही. त्याकरिता जगात सर्वत्र एकाच प्रकारची बॅलन्सशिट तयार करावी लागेल.
प्रश्न : कायद्यांमध्ये काही बदल झाले आहेत का?
उत्तर : हो, झाले आहेत. १९५६ नंतर कंपनी कायदा २०१३ ला बदलला; तर त्याची नियमावली २०१४ मध्ये बदलली; कारण वर्षानुवर्षे एकाच आॅडिटरने तपासणी केल्यानंतर ‘सत्यम’सारख्या कंपनीने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला. हे पैसे सर्वसामान्य माणसांचे होते. त्याचबरोबर ज्या कंपन्यांनी ५०० कोटींपेक्षा अधिक भांडवल किंवा ५० कोटी इतके बँक कर्ज घेतले आहे, त्या कंपन्यांनी दर तीन वर्षांनी आॅडिटर बदललाच पाहिजे. त्याने वार्षिक अहवाल सरकारच्या वाणिज्य विभागाला सादर करणे गरजेचे आहे. कारण या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायद्यात बदल केला आहे.
प्रश्न : अभ्यासक्रमात झालेले बदल विद्यार्थ्यांसमोर कसे आणणार?
उत्तर : ‘आयएफआरएस’च्या संदर्भातील व भारतीय कंपनीज लॉसंबंधी बदललेले निकष विद्यार्थ्यांसमोर येण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत कोल्हापुरातील सर्व वाणिज्य महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठ यांच्या मदतीने कार्यशाळा घेतली जाईल. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी या क्षेत्रात यावेत याकरिताही प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय १ जुलैला ‘विश्व सनदी लेखापाल दिवस’ असतो. त्यानिमित्त अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. वेस्टर्न इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (विकासा)मार्फतही कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
प्रश्न : आपण या क्षेत्रात कसे आकर्षित झालात?
उत्तर : माझे वडील महापालिकेत नोकरी करीत होते. त्यांची ओळख ज्येष्ठ सीए पी. जी. दिवाण यांच्याबरोबर होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर मीही दिवाण सरांच्या कार्यालयात जात होतो. त्यामुळे मलाही सरांसारखे व्हावे असे वाटत होते. मी दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकलो; तर पुढे डी. आर. के. कॉलेज आॅफ
कॉमर्समधून वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केली. २००२ मध्ये सी.ए. झालो.
- सचिन भोसले

Web Title: The importance of Indian chartered accountants increased- Direct Dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.